गावदेवी पाड्यात गटार कामात हलगर्जी
रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य; विद्यार्थ्यांना दररोज त्रास
पनवेल, ता. ११ (बातमीदार) : शहरातील गावदेवी पाडा परिसरात सुरू असलेल्या गटार दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. कामादरम्यान काढलेला चिखल रस्त्यावरच टाकल्याने पादचारी मार्ग अरुंद झाला असून, शाळकरी मुलांना दररोज चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. सकाळच्या शाळेच्या वेळेत तर विद्यार्थ्यांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होते.
चिखलामुळे बूट-चप्पल रुतणे, कपडे मळणे, घसरण्याचा धोका, रस्त्यात उडणारा चिखल यांसारखे त्रास वारंवार उद्भवत आहेत. मोटारसायकलस्वार व वाहनधारकांनाही घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी काम करणाऱ्या ठेकेदार व पालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करूनही परिस्थितीत बदल झालेला नाही.
पालिका प्रशासनाकडे अडथळे दूर करण्याची, चिखल तत्काळ हटवण्याची आणि रस्त्यांची योग्य स्वच्छता करण्याची मागणी जोर धरत आहे. ‘काम सुरू असताना किमान सुरक्षितता व स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे, पण पालिकेच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे,’ असा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.
या संदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, “गटारकाम लवकर पूर्ण करून रस्त्यांची स्वच्छता करण्यात येईल,” अशी माहिती देण्यात आली.
चौकट :
परिसरातील समस्या
- चिखल रस्त्यावर टाकल्याने पादचारी मार्ग अरुंद
- शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखलातून चालण्याची वेळ
- बूट-चप्पल रुतणे, कपडे मळणे, घसरण्याचा धोका
- दुचाकीस्वारांसाठी अपघाताची शक्यता वाढली
- नागरिकांच्या तक्रारींकडे ठेकेदार-पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
- स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेची पूर्णपणे उपेक्षा