माणगावात कोकण फेस्टिव्हलला सुरुवात
खाद्य-सांस्कृतिक मेजवानीचा अनोखा संगम
माणगाव, ता. ११ (वार्ताहर) ः माणगाव शहरात प्रथमच भव्य आणि सर्वसमावेशक ‘कोकण फेस्टिव्हल २०२५’चे आयोजन शुक्रवार (ता. १२) ते सोमवार (ता. २२)पर्यंत करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणगावात ११ दिवस चालणाऱ्या या उत्सवात कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीपासून आधुनिक कलाविष्कारापर्यंत सर्वांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. माणगाव, रायगड, संपूर्ण कोकण तसेच राज्यभरातील प्रेक्षकांच्याही मोठ्या उपस्थितीत हा महोत्सव रंगणार आहे.
उद्घाटन समारंभ शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता ढोल-ताशांच्या गजरात होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ, लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये तसेच ‘चला हवा येऊ द्या’फेम सुप्रसिद्ध निवेदक, लेखक-दिग्दर्शक डॉ. नीलेश साबळे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, तसेच न्यायालयीन मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात रायगड व कोकणातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केला जाणार आहे.
.........................
विविध स्पर्धांचे आयोजन
शॉर्टफिल्म फेस्टिव्हल, काव्यवाचन स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, अभिनय स्पर्धा, लावण्यवती स्वाती पुणेकर यांचा लावणी महोत्सव, बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप, रेकॉर्ड डान्स शो, ‘कोकण सुंदरी’ सौंदर्य स्पर्धा यांसह १४ भाषांमध्ये ४,५०० हून अधिक प्रयोगांचा विक्रम असलेले लोकप्रिय कौटुंबिक नाटक ‘ऑल द बेस्ट’ व हास्यकलावंत भाऊ कदम यांचे अतिशय विनोदी, कौटुंबिक नाटक ‘सिरियल किलर’ ही कार्यक्रमांची खास आकर्षणे असणार आहे. रायगड सांस्कृतिक कला मंडळ, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक नाते जपणारे व्यासपीठचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. अजय आत्माराम मोरे, सेक्रेटरी अंकिता मोरे, कार्याध्यक्ष प्रमिला हितेन छेडा व सर्व पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कोकण संस्कृतीचा उत्सव, खाद्यपदार्थांचे आकर्षण आणि कला-संगीताच्या रांगोळ्यांनी नटलेला हा फेस्टिव्हल माणगावकरांसाठी आणि कोकणकरांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे.