Kolhapur Wildlife Terror : पन्हाळा शाहूवाडी परिसरात वन्यप्राण्यांचा अक्षरशः कहर; बिबट्या, रानडुकरांच्या हल्ल्यांनी शेतकरी भयभीत, वन विभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी
esakal December 11, 2025 06:45 AM

कोतोली : निवडे (ता. पन्हाळा) परिसरातील उंड्री, खोतवाडी तसेच नांदगाव (ता. शाहूवाडी) परिसरातील विचारेवाडी, नांदारी, धनगरवाडा तसेच सोनुर्ले परिसरातील पाटीलवाडी, चिंचेवाडी, केसरकरवाडी, परळी, खोतवाडी, दरेवाडी, मांडवकरवाडी, धोंडेवाडी, कासारवाडी, घुंगुर हा परिसर वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली आहे.

परिसरात बिबट्या, गवे आणि रानडुकरांनी अक्षरशः उच्छाद मांडल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. यावर वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिमेस येणारा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे.

Raigad Leopard : सुधागड तालुक्यात बिबट्याची दहशत; नागशेत व कोशिंबळे परिसरात तीन पाळीव जनावरांचा बळी!

येथे जंगलाचे प्रमाण अधिक असल्याने येथे बिबट्या, गवे, रानडुकरांसारख्या प्राण्यांचे वास्तव्य आहे. या वन्यप्राण्यांना लागणारे खाद्य पूर्वी जंगलामध्ये मिळत होते; पण अलीकडे जंगलामध्ये माणसांचे झालेले अतिक्रमण आणि जंगलतोडीमुळे प्राणी बाहेर पडत आहेत. बिबट्या प्राणी मांसभक्षक असल्याने तो गाय, बैल, शेळी, वासरू, कुत्रे यासारख्या प्राण्यांवर हल्ला करत भक्ष्य बनवित आहे.

रानडुकरे ऊस पिकासह रब्बी पिकांचे नुकसान करत आहेत. या प्राण्यांनी माणसांवरही हल्ले केले आहेत. ज्यामध्ये अनेकजण जखमी झाले असून काहींना प्राणही गमवावे लागले. सोनुर्ले परिसरातील चिंचेवाडीत विलास पाटील यांच्या तर धोंडेवाडीत सदाशिव मुगडे यांच्या शेळीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्या मृत्युमुखी पडल्या आहेत.

Jalna Leopard : रुईमध्ये बिबट्याचा आणखी एक हल्ला; २० दिवसांत दुसरी घटना; गाईचा फडशा पाडत; गावात भीतीचे सावट गडद!

उंड्रीत खोतवाडी रस्त्यावरील तानाजी यादव यांच्या पाळीव कुत्र्यावर तसेच गोठ्यातील गायीच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला होता. शाहूवाडी तालुक्यातील खोतवाडीत बिबट्याने गाय तसेच अनेक पाळीव कुत्रीही मारली आहेत.

सोनुर्ले परिसरात पाळीव जनावरांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागाने योग्य त्या उपाय योजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

- संजय मुगडे, तंटामुक्त अध्यक्ष, सोनुर्ले

बिबट्या, अन्य वन्यप्राण्यांच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी जंगलामध्ये पाणवठ्यावर ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पाळीव जनावरांपोटी नुकसानभरपाई दिली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून बचावासाठी उपाययोजनांचे मार्गदर्शन सुरू आहे.

- अतुल कदम, वनरक्षक, परळी

शेतीकामांचा खोळंबा

सध्या शेतीच्या कामाचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना शेतीत गेल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. रात्री-अपरात्री रस्त्यावरून प्रवास करणेही धोक्याचे झाले आहे. वन विभागाने योग्य उपाययोजना करून दिलासा द्यावा; अशी मागणी होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.