सराईत गुन्हेगार ठाणे पोलिसांच्या जाळ्यात
ठाण्यातील दोन घरफोड्या गुन्ह्यांची कबुली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरातील विविध भागात बंद घरांचे कुलूप कोयंडा तोडून घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार दीपक वैश्य (४०) याला वागळे इस्टेट पोलिसांनी अखेर मुंबईतील गोवंडी येथून अटक केली आहे. दीपक वैश्य याच्यावर ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईत १७ घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांनी मंगळवारी (ता. ९) दिली.
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील अंबिका नगर परिसरातील सुरेखा खेडेकर कामावर गेल्या असताना अनोळखी व्यक्तीने त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ८२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी घडली होती, याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वागळे इस्टेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ए. आर. कांबळे आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून चोरट्याचा शोध घेतला. या गुन्ह्यातील चोरटा हा मुंबईतील सराईत घरफोड्या दीपक वैश्य असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली आणि पथकाने दीपक वैश्य याच्यावर पाळत ठेवून गोवंडी परिसरातून शिनवारी (ता. ६) त्याला अटक केली.
मुंबईसह नवी मुंबईतील गुन्ह्यांची कबुली
चौकशीत दीपक वैश्य याच्यावर मुंबई, नवीमुंबई, मिरा-भाईंदर, विरार येथे १५ घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. ठाण्यातदेखील त्याच्यावर श्रीनगर पोलिस ठाण्यात दोन घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून ३१.४८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे, तर आठ ग्रॅम चांदी आणि ७५ हजार ५०० रुपये असा एक लाख ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तो दिवसा रेकी करून बंद घराचे टाळे तोडून चोरी करीत असल्याची माहिती कदम यांनी दिली.