मालेगाव बालिका अत्याचार; कार्ल्यांत रास्ता रोको आंदोलन
esakal December 11, 2025 09:45 AM

लोणावळा, ता. १० : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात घडलेल्या साडेतीन वर्षीय बालिकेवरील अमानुष अत्याचार आणि खून प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. बुधवारी (ता.१०) तीव्र आंदोलन छेडत कार्ला फाटा येथे मावळवासीयांनी पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग रोखत रास्ता रोको करून आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी केली.
सकाळी अचानक मोठ्या संख्येने नागरिक, महिला वर्ग, स्थानिक तरुण व विविध संघटनांचे कार्यकर्ते महामार्गावर उतरले. कार्ला येथील शिवमंदिर ते पुणे-मुंबई महामार्ग असा निषेध मोर्चा काढण्यात आला. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळित झाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली आणि वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली. यावेळी महिलांनी मनोगत व्यक्त करत ‘आरोपीला तत्काळ आणि कठोर शिक्षा मिळाली पाहिजे,’ अशी एकमुखाने मागणी करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीने केलेला कृत्य हा मानवतेलाच काळिमा फासणारे असून, अशा गुन्हेगारांना तत्काळ फाशीची शिक्षा देत कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. या प्रकरणात वेगवान तपास, विशेष न्यायालयात जलदगती सुनावणी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली.
रास्ता रोकोदरम्यान आंदोलकांनी निषेध फलक, घोषणाबाजी करून पीडित बालिकेला श्रद्धांजली वाहिली. सुमारे तासाभराच्या आंदोलनानंतर पोलिसांच्या विनंतीवरून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र ‘न्याय न मिळाल्यास मोठे आंदोलन करू’ असा इशाराही आंदोलकांनी दिला.

छायाचित्र: LON25B04977/04979

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.