तळेगाव दाभाडे, ता. १० : तळेगाव नगर परिषदेत महायुतीची एकजूट कायम राहिली. पण, वडगाव नगर पंचायत आणि लोणावळा नगर परिषदेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकमेकांविरोधात उभे राहिले. तर, शिवसेना आणि रिपाइंची युती झाली. या विसंगत राजकीय भूमिकांमुळे विविध शासकीय समित्यांवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पदाधिकऱ्यांची गोची झाली आहे.
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्हा व तालुकास्तरीय विविध शासकीय समित्यांमध्ये नव्या नियुक्त्यांची प्रक्रिया गतिमान होण्याची अपेक्षा होती. मावळ तालुक्यातही तिन्ही पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध समित्यांमध्ये स्थान मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी केली. मात्र, आता नगर परिषदांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी परस्परविरोधी भूमिका घेतल्या. या स्थितीमुळे या समित्यांमध्ये कोणत्या गटाला किती प्रतिनिधित्व द्यायचे, कोणाची शिफारस मान्य करायची यावर निर्णयप्रक्रिया अडखळत आहे. परिणामी, नियुक्त्यांची प्रतीक्षा करणारे अनेक इच्छुक कार्यकर्ते पुन्हा ‘गॅसवर’ राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या समित्यांमध्ये प्रामुख्याने जिल्हा नियोजन समिती, संजय गांधी निराधार योजना समिती, महिला व बालकल्याण, स्वच्छ भारत महिला समिती, क्रीडा, शिक्षण आदी अनेक समित्यांमध्ये नव्या सदस्यांच्या नियुक्त्या होणार असल्याने गेल्या जवळपास वर्षभर सर्वच राजकीय गटांत हालचाली सुरू होत्या. मात्र, निवडणुकीतील भूमिका बदलांनी सर्वांचीच अडचण झाली आहे.
कार्यकर्त्यांत संभ्रम आणि नाराजी
महायुती सरकार आल्यानंतर पालकमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांकडे वशिल्यासाठी कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली होती. यात तळेगाव, लोणावळा, वडगाव आणि ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर नावे पाठवली गेली. मात्र, अद्याप कोणत्याही समित्यांच्या नियुक्त्यांची घोषणा न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम व नाराजी निर्माण झाली आहे. मावळातील राजकीय समीकरणे प्रत्येक निवडणुकीनुसार बदलत असल्याने त्याचा फटका कार्यकर्त्यांना बसत असल्याचे बोलले जात आहे.