भटक्या श्वानांच्या उपद्रवातून सुटका
बोईसर, मनोर येथे निर्बीजीकरण केंद्राचे उद्घघाटन
पालघर/मनोर, ता. ११ (बातमीदार)ः भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानअंतर्गत जिल्हा परिषदेने बोईसर, मनोर, सफाळे येथे स्वतंत्र श्वान निर्बीजीकरण केंद्रे स्थापन केली आहेत. यापैकी बोईसर येथील केंद्र कार्यान्वित झाले आहे, तर मनोर केंद्राचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. त्यामुळे भटक्या श्वानांच्या उपद्रवातून पालघर जिल्हावासीयांची सुटका होणार आहे.
सातपाटी, अर्नाळा, दांडी या समुद्रकिनारी भागात श्वान निर्बीजीकरण तसेच रेबीज लसीकरणाची मोहीम गेली दोन वर्षे राबविण्यात आली होती. यावर्षी प्रथमच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानअंतर्गत शासनाच्या सूचनांनुसार केंद्रआधारित प्रणाली सुरू झाल्याने श्वान संकलन, निर्बीजीकरण, लसीकरण आणि त्यानंतरची निगा ही प्रक्रिया सुरू झाली आहे, बोईसर येथे स्थापन केलेले पहिले केंद्र जिल्हा परिषद पालघर, युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आले आहे. पोलिस गृहनिर्माण सोसायटी येथे ही केंद्र स्थापन करण्यात आले आहे. येथे श्वान संकलन, तीन ते चार दिवसांची निगा, शस्त्रक्रिया आणि रेबीज लसीकरण ही प्रक्रिया प्रशिक्षित तज्ज्ञांकडून केली जाते.
----------------------------------------
संवेदनशील भागांपासून सुरुवात
मनोर ग्रामपंचायत हद्दीमध्ये केंद्राची स्थापना करण्यात आली. भटक्या श्वानांची अनियंत्रित वाढ, नागरिकांचा वाढता त्रास आणि रेबीजचा धोका लक्षात घेता ही केंद्रे उभारण्यात आली होती. रेबीजचा धोका कमी करणे तसेच नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, यासाठी निर्बीजीकरण मोहीम आहे. जिल्ह्यातील संवेदनशील भागांपासून उपक्रमाची सुरुवात केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिली.