मोहोळ : सप्टेंबर मध्ये मोहोळ तालुक्यातील सीना नदीला आलेल्या महापुरा मुळे ज्या शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान झाले नाही अशा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळाली, मात्र ज्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित ठेवले आहे. हे प्रकार ज्या तलाठी व ग्रामसेवक या सरकारी बाबुंनी केले त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे अशी गंभीर तक्रार मोहोळचे आमदार राजू खरे यांनी सध्या सुरू असलेल्या नागपूर येथील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात केली.त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणी दोषी असणाऱ्या सरकारी बाबुंची पाचावर धारण बसली आहे.
दरम्यान जे शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत त्यांचे फेर पंचनामे करावेत व त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी आमदार खरे यांनी केली आहे. त्यामुळे आता पंचनामे होणार का? नुकसान भरपाई मिळणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, सप्टेंबर महिन्यात मोहोळ तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. परंतु सीना नदीवरील उस्मानाबाद जिल्ह्यातील सीना- कोळगाव धरण परिसरातही मोठा पाऊस झाला होता. त्यामुळे त्या धरणातून दोन ते तीन लाख क्युसेक्स ने पाणी सीना नदीत सोडले जात होते. त्यामुळे सीना नदी क्षमते पेक्षा दहापट ज्यादा क्षमतेने वाहत होती. सीना नदीकाठची गावे च्या गावे पाण्याखाली गेली. तेथील शेतकऱ्यांची शेती, जनावरे, घरे वाहुन गेली. तसेच द्राक्ष, डाळिंब, कांदा, ऊस, मका ही पिकेही वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
Premium|Paithani Saree : दोन हजार वर्षांचा पैठणीचा वारसा; महाराष्ट्राच्या महावस्त्राची गौरवशाली कहाणीया नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने अधिकाऱ्यांना दिले. पंचनामे झाले, अहवाल ही प्रशासनाला सादर झाला, त्या अनुषंगाने शासनाने 32 कोटीचे नुकसान भरपाई चे पॅकेज ही दिले. मात्र ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देताना मोठ्या प्रमाणात दुजाभाव झाला आहे. हा गैरप्रकार पीरटाकळी, शेरेवाडी, लांबोटी, गुंजेगाव, नांदगाव, विरवडे बुद्रुक यासह अन्य भागातही मोठ्या प्रमाणात झाला आहे.
ज्या भागाचे पुरामुळे नुकसान झाले आहे तो भाग अद्यापही सावरला नाही. त्या परिसरात गेल्या तीन महिन्या पासून शेतीसाठीचा विद्युत पुरवठा खंडित आहे. त्यामुळे त्या परिसरातील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठया अभावी पिके करता येईनात.त्यामुळे जनावरांना व माणसांना पिण्याच्या पाण्याची अडचण झाली आहे. अशा अडचणीच्या परिस्थितीत लांबोटी येथील महावितरणचा शाखा अभियंता ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी शेतकऱ्याकडे मोठ्या रकमेची मागणी करीत आहे. जो बागायतदार मोठा आहे तो पैसे देऊ शकतो, परंतु गोरगरीब शेतकऱ्यांना वाली कोण? या अधिकाऱ्याची चौकशी करून त्याला निलंबित करण्याची मागणीही आमदार खरे यांनी केली आहे.
आमदार खरे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही त्या शाखा अभियंत्याची चौकशी सुरू केली आहे. कोणी असा प्रकार केला? कोणी शेतकऱ्यांना पैसे मागितले? हे चौकशी करून वरिष्ठांना तसा अहवाल देणार आहोत. आम्ही सर्वांचीच कामे करीत आहोत, कोणालाही अडचणीत आणण्याचा आमचा प्रयत्न नाही. मात्र हा प्रकार गंभीर आहे.
जी.जी. पटवेकर----- सहाय्यक अभियंता विद्युत महावितरण मोहोळ
तालुक्यातील ज्या गावात असा प्रकार झाला असेल व तो कुठल्या तलाठी व ग्रामसेवकाने केला आहे त्याची तातडीने चौकशी करून कारवाई साठीचा अहवाल वरिष्ठाकडे सादर करणार आहोत.
सचिन मुळीक, तहसीलदार मोहोळ