>> राहुल गोखले
एखाद्या साप्ताहिकातून सतत तीन दशके एकहाती स्तंभलेखन करणे आणि तरीही त्यात ताजेपणा कायम राखणे हे वाटते तितके सोपे नाही. मात्र प्रा. जयंत जोर्वेकर यांनी ते करून दाखवले आहे. त्यांच्या याच स्तंभातील निवडक लेखांचे `मर्मबंध : भाग 3′ (प्रकाशक : अक्षता प्रकाशन) हे पुस्तक होय. प्रा. जोर्वेकर एका साप्ताहिकात गेली पस्तीस वर्षे हा स्तंभ चालवतात अशी माहिती प्रस्तुत पुस्तकाच्या मलपृष्ठावरील मजकुरातून मिळते. त्या पार्श्वभूमीवर लेखांतील विषयवैविध्य तसेच ताजेपणा नोंद घेण्याजोगा.
या पुस्तकात चव्वेचाळीस लेख आहेत. प्रत्येक लेख छोटेखानी. त्यात लेखकाने स्पर्श केलेले विषय मात्र अगणित आहेत. कोणत्या ना कोणत्या सामाजिक वैगुण्यावर त्यातून लेखकाने बोट ठेवले आहे आणि काही ठिकाणी त्यावर मार्गही सुचविले आहेत. लेखकाने बहुतांशी लेखांत संभाषणात्मक शैलीचा किंवा प्रसंगांच्या वर्णनांचा वापर केल्याने ते लेख रुक्षपणापासून अलिप्त आहेत. `उचापती’ लेखातून लेखकाने `ब्रह्मे’ नावाच्या व्यक्तीच्या स्वभावाचे वर्णन केले आहे. कोणी अडचणीत असला तर ब्रह्मे लगेच त्याच्या समस्यानिवारणासाठी लगबग करत. त्यामुळे अडचणीत असणाऱया वक्तीला ब्रह्मेबद्दल आदर निर्माण होई; पण दुसऱयाच्या खासगी आयुष्यात डोकावणाऱया उचापती माणसाच्या वृत्तीवर लेखकाने त्यातून बोट ठेवले आहे.
`संस्कार’ लेखात लेखकाने संपत्तीवरून कौटुंबिक कलहाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा उल्लेख केला आहे. त्या पार्श्वभूमीवर वर्तक या आपल्या मित्राच्या वडिलांच्या निधनानंतर त्या कुटुंबात संपत्तीपेक्षा नात्यांना महत्त्व देणाऱया माणसांचे लोभस दर्शन घडविले आहे आणि खरे संस्कार कोणते याकडे लक्ष वेधले आहे. `कशासाठी? कोणासाठी?’ या लेखातून लेखकाने प्रा. मित्रा यांच्या तोंडून सामाजिक वास्तवाचे दर्शन घडविले आहे. समाज म्हणून आपण सामाजिक समस्यांवर मूलभूत तोडगा काढण्याऐवजी दिखाऊपणाला कसे भुलतो यावर लेखक प्रहार करतो.
सामाजिक जीवनात मुलगा-मुलगी भेद नाकारणाऱया रत्नमालाबाई आपल्या सुनेला मुलगी होणार हे समजल्यावर तिला गर्भपात करून घेण्याचा सल्ला देतात, असा धक्कादायक शेवट असणाऱ्या `शब्द माझे आणि इतरांचे वेगवेगळे’ या लेखातून लेखकाने सामाजिक जीवनात उत्तुंग वाटणाऱया माणसांचे पाय मातीचेच कसे असतात या विसंगतीवर भाष्य केले आहे. काही लेखांतून लेखकाने वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. `कृती हवी’ या लेखातून लेखकाने डॉक्टरेटसाठी संशोधन विषय हे काल्पनिक असण्यापेक्षा दाहक वास्तवाचा शोध घेणारे का असू नयेत? असा सवाल उपस्थित केला आहे; तर `स्फोट’ या लेखातून समाजात कोवळ्या वयातील मुले व्यसनी, हिंसक होऊ लागली आहेत ही चिंता व्यक्त केली आहे.
एका बाजूला भारतीय संस्कृतीचे गोडवे गायचे व दुसऱया बाजूला मात्र अशी चिंताजनक स्थिती असावी यावर लेखक विषाद व्यक्त करतो. बिपीन या परदेशात स्थायिक असलेल्या तरुणाला भारतात परतायची इच्छा असूनही धाडस का होत नाही याचा शोध लेखकाने `बेदरकारी श्रीमंती’ या लेखात घेतला आहे. एकदा परदेशातील वातावरणाची सवय झाली की भारतात कायद्याचे, शिस्तीचे बिनदिक्कत उडणारे धिंडवडे, रस्ता अपघातासारखी असुरक्षितता, अस्वच्छता यांमुळे परत येण्याची इच्छा कशी मरून जाते यावर भाष्य करणारा लेख कदाचित अनेकांचे मनोगत व्यक्त करणारा आणि अंतर्मुख करणारा. सामाजिक बांधिलकी जपणाऱया काही उपामांचा उल्लेख लेखकाने काही लेखांतून केला आहे व अशा उमेद वाढविणाऱया उपामांची समाजाला गरज असल्याचे सूचित केले आहे. मात्र लेखांचा भर हा सामाजिक वर्मावर बोट ठेवण्यावर आणि आरसा दाखविण्यावर आहे. लेखांची भाषा सोपी व प्रवाही असल्याने वाचकांना ते रुचतील.
तथापि पुस्तकावर संपादकीय हात पुरेसा फिरलेला नाही हा दोषही नमूद करायला हवा. काही लेख केवळ शीर्षक बदलून तसेच्या तसे पुस्तकात दोनदोनदा समाविष्ट करण्यात आले आहेत. `लिव्ह इन रिलेशनशिप’मधील धोक्यांवरील तोच लेख `लिव्ह इन’ व `निर्णय’ अशा दोन शीर्षकांखाली आला आहे; तर `बेदरकार श्रीमंती’ व `निगेटिव्ह’ या दोन शीर्षकांखाली आलेले लेख एकसारखेच आहेत. एरव्ही लेख वाचून वाचक अंतर्मुख होत असताना हा द्विरुक्तीचा दोष मात्र वाचकांचा रसभंग करतो. सतीश भावसार यांनी केलेले मुखपृष्ठ वेधक आहे.
मर्मबंध भाग-3
लेखक : प्रा. जयंत जोर्वेकर
प्रकाशक : अक्षता प्रकाशन, पुणे
पृष्ठे : 174 ह मूल्य ः 250 रुपये