बॅग पॅकर्स : पर्वतरांगांत दडलेला ट्रेक – गुलाबी कंठ
Marathi December 14, 2025 12:25 PM

>> चैताली कानिटकर, [email protected]

शांत, कमी गर्दीचा आणि एकांताचा अनुभव देत वेगळ्या वाटांचे आकर्षण असणाऱ्या ट्रेकर्ससाठी योग्य असा हा ट्रेक. वसंत ऋतूमधील बहर आणि हिवाळ्यातील बर्फाने आच्छादलेला हा गुलाबी कंठ ट्रेक करायलाच हवा या यादीत येतो.

उन्हाळ्यातही हिरव्यागार कुरणांच्या छटा, वसंत ऋतूमधला बहर आणि हिवाळ्याच्या मोसमातील बर्फाच्छादित रस्ते असा परिपूर्ण अनुभव घ्यायचा असेल तर उत्तराखंडमधील सोपा ते मध्यम कठीण अशा वर्गात मोडणारा ट्रेक म्हणजे गुलाबी कंठ.

शांत, कमी गर्दीचा आणि एकांताचा अनुभव देणारा व अनोखे पर्वतीय आकर्षण शोधणाऱया ट्रेकर्ससाठी अगदी योग्य असा हा ट्रेक आहे. फक्त पाच दिवसांचा हा ट्रेक असून उंची 13,200 फूट आहे. ट्रेक द हिमालयाज, इंडिया हाइक्स यांच्यासोबत हा ट्रेक करता येतो. हा ट्रेकसुद्धा डेहराडूनपासून सुरू होतो.

उत्तरकाशी जिह्यातील बारकोट या सुंदर शहराकडे जातानाचा हा प्रवास मार्ग हिरव्यागार दऱया, वळणावळणाच्या डोंगराळ रस्त्यांमधून आणि यमुना नदीच्या काठावरून जातो. डेहराडून सोडताना, रस्ता हळूहळू मसुरीकडे चढतो, ज्याला ‘टेकडय़ांची राणी’ म्हटले जाते. त्यानंतर गाडी नौगावातून जाते, जे सफरचंदाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. यापुढे लागते ते हिमालयीन भागात वसलेले बारकोट शहर. या शहराचे सुंदर निरभ्र दृश्य, इथले आल्हाददायक वातावरण आणि निसर्गरम्य परिसर आपल्याला प्रेमातच पाडतात. प्रसिद्ध यमुनोत्री मंदिराकडे जाणाऱया मार्गावरील हे ठिकाण उंच पर्वतरांगांकडे जाणाऱया ट्रेकर्स आणि यात्रेकरूंसाठी देखील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. हा बेस कॅम्प असून विश्रांती घेऊन पुढल्या दिवशी ट्रेक सुरू होतो.

पुढचा हनुमान चाटी ते कंदोळा छणी हा ट्रेक पाच ते सहा तासांचा आहे. या ट्रेकची सुरुवात सोप्या चढाईने होते. या चढाईच्या वाटेत पाण्याचे झरे, गावांचा परिसर, जंगल प्रदेश आणि पर्वत नजरेस पडतात. ही वाट अतिशय सुंदर अशा निश्नी गावातून जाते. येथे यमुना व्हॅली शैलीत बांधलेली लाकडी घरे पाहायला मिळतात. या गावाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे सुंदर डिझाइन केलेले बहुमजली शिव मंदिर, जे स्थानिकांसाठी आध्यात्मिकदृष्टय़ा महत्त्वाचे आहे. निश्नी ओलांडल्यानंतर, ही वाट हळूहळू कांदोला छानीपर्यंत सोबत करते. कांदोला छानी हे उंचावरील एक सुंदर ठिकाण जे घनदाट ओक आणि पाइन वृक्षांच्या जंगलाने वेढलेले आहे. या वृक्षांच्या निमुळत्या होत गेलेल्या भागातून आपल्याला दूरवरच्या बर्फाच्छादित शिखरांचे दर्शन होते. ‘छानी’ या शब्दाचा अर्थ आहे शेतीसाठी आणि गुरे चरण्यासाठी वापरली जाणारी गावातील मोकळी जागा. याच भागात निश्नी ग्रामस्थांच्या मालकीच्या काही लाकडी झोपडय़ा आणि शेतजमिनी आहेत, जिथे बटाटे, राजमा आणि बाजरी अशी पिके घेतली जातात. अशा निसर्गाने लयलूट केलेल्या जागेचे सौंदर्य मनाला आणि शरीराला न भावेल तर नवलच.

पुढे तिसऱया दिवशी, कांदोला छानी ते सीमा थॅचपर्यंतचा ट्रेक आहे. हा प्रवास तीव्र चढाईचा असून, दाट ओक आणि रोडोडेंड्रॉनच्या जंगलांमधून ही वाट जाते. वाट संपत आली की समोर सीमा थॅचचे विस्तीर्ण, खुले कुरण नजरेस पडते. अनेक मेंढय़ा येथील कुरणात छान चरत असतात. खडकाळ पर्वतांनी वेढलेले हे विस्तीर्ण कुरण, कठीण ट्रेकनंतर विश्रांतीसाठी एक उत्तम ठिकाण आहे. सीमा थॅचमधील सर्वात मोहक क्षण म्हणजे सूर्यास्त. पर्वतांच्या मागे सूर्य मावळतो, आकाश नारिंगी, गुलाबी आणि जांभळ्या रंगांच्या नेत्रदीपक वर्णांनी उजळून निघते आणि कुरणांवर सोनेरी चमक येते.

चौथा दिवस हा समीटचा दिवस. सीमा थॅच ते गुलाबी कंठ आणि परत कांदोला छानीकडे असा हा उताराकडे व पुढे चढणीकडे जाणारा मार्ग. पुढे पुढे येताना मार्गावर अतिशय सुंदर, मोहक अशी निसगदृश्यं आपल्याला दिसतात. हिवाळ्याच्या महिन्यांतील बर्फाच्छादित गालिचे आणि उन्हाळ्यात अल्पाइन फुलांचा एक चमकदार गालिचा, असं प्रत्येक ऋतूतील मोहवणारे दृश्य असते. हे अनुभवत आपण गुलाबी कंठाच्या शिखरावर पोहोचतो. हिमालयाचे 360 अंशातील अनेक शिखरांचे विहंगम दृश्य येथून दिसते.

शेवटच्या दिवशी, ट्रेकचा शेवटचा टप्पा कांदोला छानी ते हनुमान छत्तीपर्यंत घेऊन जाईल. हनुमान छत्तीजवळ पोहोचताच परतीचा प्रवास संपतो. हनुमान छत्ती येथून, डेहराडूनला परतण्यासाठी वाहनाने प्रवास आहे. आजूबाजूच्या टेकडय़ांच्या दृश्यांसह निसर्गरम्य रस्त्यांवरून असलेला हा प्रवास खरोखरच लुभावणारा. गजबजलेल्या शहरात परत जाताना, सुंदर रंगीबेरंगी लँडस्केप्स, शिखरे आणि उंच हिमालयातील शांततेच्या आठवणी सोबत घेऊन, अनुभवांची शिदोरी घेऊन येतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.