स्थानकातील नवीन सरकता जिना पुन्हा बंद
डोंबिवलीत प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ : उपनगरी मार्गावरील सर्वाधिक वर्दळीच्या डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३ आणि ४ दरम्यान कल्याण दिशेकडील नव्याने सुरू केलेला सरकता जिना पुन्हा एकदा बंद पडला आहे. केवळ तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या जिन्याचे वारंवार बंद पडणे, यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डोंबिवली स्थानकातील या सरकत्या जिन्याची अवस्था ‘चालू दिवसांपेक्षा बंद दिवसच अधिक’ अशी झाली आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी जिना बंद असल्याने प्रवाशांना पुन्हा पायऱ्या चढण्याचा त्रास सहन करावा लागतो. ‘‘हा जिना कायमस्वरूपी बंद ठेवायचा असेल, तर साध्या पायऱ्यांचा जिनाच बांधला असता, तर तो अधिक सोयीस्कर ठरला असता,’’ अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करत आहेत. जिन्याच्या तोंडाशी आणि स्कायवॉकवर अनावश्यक गर्दी निर्माण होत असल्याने ढकलाढकली होते आणि अपघाताचा धोका वाढतो, अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
डोंबिवली स्थानकात सध्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत, प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या नव्या जिन्याची नियमित देखभाल करून तो पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
दरम्यान, या समस्येची दखल घेत मनसेचे माजी नगरसेवक मनोज घरत यांनी गुरुवारी (ता. ११) स्टेशन मास्तरांची भेट घेऊन जिना तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. ‘‘या समस्येवर तातडीने उपाययोजना न झाल्यास मनसे स्टाइलने आंदोलन छेडले जाईल,’’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.
------------------
डोंबिवली स्थानकाचे नूतनीकरण काम दीड वर्षापासून अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. फलाट क्रमांक ३ आणि ४ वरील सरकता जिना सतत बंद राहतोय, यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. सुधारणा न झाल्यास मनसे स्टाइलने आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
- मनोज घरत, माजी नगरसेवक