पर्ससीन मासेमारीला दणका
मुंबई, रागयड जिल्ह्यातील सहा ट्रॉलर्स जप्त
पालघर, ता.१५ ः पर्ससीन जाळ्याने बेकायदा मासेमारी करणाऱ्या मुंबई, रागयड जिल्ह्यातील सहा ट्रॉलर्सवर मत्स्यव्यवसाय विभागाने शनिवारी कारवाई केली. केळवे समुद्रापासून आठ नॉटिकल मैलावर ही कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याच्या १२ नॉटिकल मैलापर्यंत पर्ससीन बोटींना मासेमारीची बंदी आहे. असे असताना ट्रॉलर्स बेकायदेशीर पद्धतीने राज्यहद्दीमध्ये येऊन मासेमारी करत आहेत. अलीकडच्या काळात ट्रॉलर्सच्या येण्याचे प्रमाण वाढले असून, काही महिन्यांत मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आठ ते दहावेळा कारवाया करण्यात आल्या आहेत. असे असताना शनिवारी पुन्हा ट्रॉलर्स आढळून आल्याने मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने ही कारवाई केली.
-------------------------
माशांचा लिलाव
- पर्ससीनद्वारे मासेमारी केल्याने मत्स्यसाठ्यांना धोका निर्माण झाला आहे. पारंपरिक मच्छीमारांना पर्ससीन बोटींचा मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाला दिले होते.
- मुंबई कुलाबा आणि रायगड येथील खंडोबा, लक्ष्मीनारायण, वैष्णवी, मोरया, हिंगलाई देवी, महालक्ष्मी ट्रॉलर्स मासेमारी करताना आढळून आल्या. त्यांच्याकडे असलेल्या तीन लाख २६ हजारांच्या माशांचा लिलाव करण्यात आला असून, ही रक्कम शासनाने जमा केली आहे.