Kartik Sharma: IPL 2026 च्या लिलावात युवा खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. प्रशांत वीर आणि आकिब नबी दार यांच्यानंतर आता कार्तिक शर्मा हे नाव चर्चेत आले आहे. या मिनी लिलावात कार्तिकला चेन्नई सुपर किंग्जने 14.20 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. त्याची बेस प्राइस फक्त 30 लाख रुपये होती, मात्र त्याला 14.20 कोटी रुपयांची बोली लागली आहे. यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील संयुक्तरित्या सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. कार्तिक शर्मा कोण आहे आणि त्याच्यावर कोणत्या संघांनी बोली लावली ते जाणून घेऊयात.
कार्तिक शर्मा हा विकेटकीपर आहे. मुंबई इंडियन्सने कार्तिक शर्मासाठी पहिली बोली लावली. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांनीही त्याला संघात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र लखनऊने माघार चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चुरस रंगली होती. मात्र यात चेन्नईने बाजी मारली. धोनीच्या संघाने 19 वर्षीय कार्तिक शर्माला 14.20 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले. त्यामुळे तो आगामी काळात धोनीच्या जागी किपींग करताना दिसू शकतो.
कार्तिक शर्मा हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थानकडून खेळतो. तो आक्रमक फटकेबाजी आणि वेगाने धावा काढण्यासाठी ओळखला जातो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 या हंगामात त्याने राजस्थानसाठी 5 सामन्यांमध्ये 160 च्या स्ट्राईक रेटने 133 धावा केल्या. कार्तिक शर्मा हा अखेरच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजीसाठी ओळखला जातो. डेथ ओव्हर्समध्ये फटकेबाजी करून सामना संघाच्या बाजूने फिरवणारे खूप कमी खेळाडू आहेत. त्यात कार्तिक शर्माचा समावेश आहे.
कार्तिक शर्माने राजस्थानसाठी अंडर-14 आणि अंडर-16 स्तरावरही क्रिकेट खेळलेले आहे. त्याने आतापर्यंत 12 टी 20 सामन्यांमध्ये 334 धावा केल्या आहेत. यात त्याचा स्ट्राईक रेट 163 च्या आसपास आहे. कार्तिक एक विकेटकीपर आहे. त्यामुळे धोनी निवृत्त झाल्यास तो त्याची जागा घेऊ शकतो. त्यामुळेच चेन्नईने त्याच्यासाठी मोठी रक्कम मोजली आहे.