अंडर 19 आशिया कप स्पर्धेत भारत आणि मलेशिया हे दोन संघ आमनेसामने आले होते. मलेशियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकीचा ठरलं असंच म्हणावं लागेल. कारण भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमवून 50 षटकात 408 धावा केल्या. तसेच विजयासाठी 409 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना मलेशियाचा डाव गडगडला आणि 93 धावांवरच ऑलआऊट झाला. हा सामना भारताने 315 धावांच्या फरकांनी जिंकली. भारताने स्पर्धेत विजयांची हॅटट्रिकच केली. इतकंच काय तर अंडर 19 क्रिकेटच्या इतिहासात एक मोठा विक्रमही प्रस्थापित केला. अंडर 19 आशिया कपच्या इतिहासात धावांच्या बाबतीत हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. या विजयाचा शिल्पकार ठरला तो अभिज्ञान कुंडू..
भारताकडून आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी पहिल्यांदा मैदानात उतरली. आयुष म्हात्रे 14 धावांवर असताना बाद झाला. तर वैभव सूर्यवंशीने 26 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार मारत 50 धावांची खेळी केली. तर वेदांत त्रिवेदीने 106 चेंडूत 90 धावा केल्या. या सामन्यात अभिज्ञान कुंडूचं वादळ घोंगावलं. त्याने 125 चेंडूत 17 चौकार आणि 9 षटकार मारत 167.20 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 209 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे भारताला 408 धावांपर्यंत मजल मारता आली. मलेशियाकडून मुहम्मद अक्रमने महागडी गोलंदाजी केली पण 5 विकेट घेतल्या. तर सथनकुमारन आणि जाश्विन कृष्णमूर्ती यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
भारताने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मलेशियाचा डाव पत्त्यासारखा कोसळला. एकही फलंदाजी मोठी खेळी करू शकला नाही. हमजा पंग्गीने सर्वाधिक 35 धावा केल्या. तर तीन खेळाडूंना खातंही खोलता आलं नाही. भारताकडून दीपेश देवेंद्रनने 9 षटकात 21 धावा देत 5 विकेट काढल्या. तर उद्धव मोहनने 2, किशन कुमार सिंगने 1, खिलन पटेलने 1 आणि कनिष्क चौहानने 1 विकेट घेतली. भारताने उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे. तर मलेशियाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचा उपांत्य फेरीचा सामना बांग्लादेश किंवा श्रीलंकेशी होईल.