Arjuna Ranatunga: विश्वचषक विजेत्या कर्णधारावर अटकेची टांगती तलवार; अर्जुन रणतुंगावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप
Tv9 Marathi December 16, 2025 03:45 PM

Arjuna Rantunga Petroleum Scam: 1996 मध्ये जागतिक विश्वचषक जिंकणारा श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार अर्जुन रणतुंगा याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तो श्रीलंका सरकारमध्ये पेट्रोलियम उद्योगमंत्री होता. आता त्याच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याचा मोठा भाऊ दम्मिका रणतुंगा हा या घोटाळ्यात दोषी आढळला आहे. दम्मिका तेव्हा सीलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष होते. दम्मिका याला 15 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आणि तुरुंगात पाठवण्यात आले. त्यानंतर जामीनावर त्याची सुटका झाली.

मोठ्या भावानंतर रणतुंगावर वेळ

अर्जुन रणतुंगाचा भाऊ दम्मिका याला देशाबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोर्टाच्या आदेशाशिवाय तो देशाबाहेर जाऊ शकत नाही. दम्मिका याच्याकडे श्रीलंका आणि अमेरिका या दोन्ही देशाचे नागरिकत्व आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी 13 मार्च 2026 रोजी होईल. भ्रष्टाचाराची चौकसी करणाऱ्या आयोगाने 63 वर्षीय दम्मिका याला 2017 मध्ये सरकारी संस्था सीलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनसाठी कच्चे तेल खरेदी करताना चुकीची निविदा प्रक्रिया राबवून उखळ पांढरे केल्याचा आरोप करण्यात आला. त्यात मंत्र्याला अटक करण्यात आली. दम्मिका याने श्रीलंका सरकारचे 80 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप चौकशी आयोगाने ठेवला. त्यात तो दोषीही आढळला.

तर चौकशी आयोगाने कोलंबो येथील कोर्टासमोर दम्मिका यांचा लहान भाऊ अर्जुन रणतुंगा हा या घोटाळ्यातील दुसरा आरोपी असल्याचा ठपका ठेवला आहे. सध्या अर्जुन रणतुंगा हा देशाबाहेर आहे. तो देशात परतल्यावर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे.

नवीन सरकारचा सत्तेवर येताच दणका

अर्जुन रणतुंगा आणि त्याच्या भावाविरोधात नव्याने चौकशी सुरू आहे. श्रीलंकेत 2024 मध्ये अनुरा कुमारा दिसानायके यांच्या अध्यक्षतेखालील नवीन सरकारची स्थापन जाली. या सरकारने देशातील जनतेला भ्रष्टाचाराविरोधात कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे. यापूर्वी अर्जुन रणतुंगा याचा भाऊ प्रसन्न याला विमा घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली होती. प्रसन्न हे कधीकाळी श्रीलंकेचे पर्यटन मंत्री राहिलेले आहेत. 2022 मध्ये प्रसन्न यांच्याविरोधात हा भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे.

अर्जुन रणतुंगाचे क्रिकेट करिअर

62 वर्षांच्या अर्जुन रणतुंगा हाश्रीलंकेचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याच्या नेतृत्वात श्रीलंकन संघाने चमकदार कामगिरी केली आहे. तर 1996 मध्ये विश्वचषक जिंकून रणतुंगा लक्ष्य भेदणारा अर्जुन ठरला होता. त्याने श्रीलंका संघासाठी 93 कसोटी आणि 293 एकदिवशीय सामने खेळले. त्याने 10000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.