कामोठेतील शिक्षिकेच्या खात्यातून लाखोंची रक्कम लंपास
esakal December 17, 2025 03:45 AM

कामोठेतील शिक्षिकेच्या खात्यातून लाखोंची रक्कम लंपास
सायबर चोरट्यांनी प्रताप; आरटीओ चलानच्या नावाखाली फसवणूक
पनवेल, ता. १६ (वार्ताहर) : कामोठे परिसरात राहणाऱ्या एका शिक्षिकेच्या बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी तब्बल २३ लाख ८८ हजार रुपये परस्पर लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरटीओ चलानच्या नावाखाली पाठवलेल्या एपीके फाइलद्वारे ही सायबर फसवणूक करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
फसवणूक झालेल्या ४५ वर्षीय शिक्षिका कामोठे सेक्टर-३४ येथे कुटुंबासह वास्तव्यास असून, त्या कळंबोली येथील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या घराच्या नूतनीकरणासाठी त्यांनी बँकेतून २४ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ही संपूर्ण रक्कम ७ डिसेंबर रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा झाली होती, मात्र दुसऱ्याच दिवशी ८ डिसेंबर रोजी सकाळी शाळेत जात असताना त्यांच्या मोबाईल फोनचे नेटवर्क अचानक बंद पडले. कॉल, मेसेज तसेच इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली. सायंकाळी घरी आल्यानंतर वायफायच्या माध्यमातून इंटरनेट सुरू झाले. त्यानंतर संशय येऊन त्यांनी दुसऱ्या दिवशी सिम कार्ड बदलून घेतले, मात्र १० डिसेंबर रोजी आईला पैसे पाठवण्यासाठी खात्यातील शिल्लक तपासली असता केवळ ७०५ रुपये उरल्याचे दिसून आले. यामुळे मोठा धक्का बसलेल्या शिक्षिकेने तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रार नोंदवली. मोबाईल तपासणीदरम्यान ‘आरटीओ चलान’ नावाचे संशयास्पद ॲप व एपीके फाइल फोनमध्ये डाऊनलोड झाल्याचे आढळून आले. बँक स्टेटमेंट तपासल्यानंतर खात्यातून २३ लाख ८८ हजार रुपये वेगवेगळ्या अनोळखी खात्यांमध्ये ट्रान्स्फर झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी कामोठे पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
.................
पोलिसांचे आवाहन :
मोबाईल नेटवर्क अचानक बंद पडणे, अनोळखी ॲप किंवा एपीके फाइल आपोआप इन्स्टॉल होणे आणि खात्यातून मोठ्या रकमेचे व्यवहार होणे, हे सायबर फसवणुकीचे स्पष्ट संकेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद लिंक, ॲप किंवा एपीके फाइल डाउनलोड करू नये तसेच बँक व्यवहारांबाबत अत्यंत सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.