लावणीचा बादशहा कुणाल पाटीलला कोकणरत्न पुरस्कार
esakal December 17, 2025 03:45 AM

rat१६p१.jpg-
P२५O१०९८२
रत्नागिरी ः शासनाचा कोकणरत्न पदवी पुरस्कार स्वीकारताना लावणीसम्राट कुणाल पाटील.
rat१६p२.jpg-
२५O१०९८३
रत्नागिरी ः लावणी अदाकारीच्या वेशात कुणाल पाटील.
----
लावणीसम्राट कुणाल पाटीलला ‘कोकणरत्न’ पुरस्कार
पुरुष नृत्यांगना म्हणून १७ वर्षे प्रवास; शासनाचा कलाश्री, कलागौरव प्राप्त
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः लावणी.. म्हटले अदाकारी आलीच... लावणी या प्रकारात महिला नृत्यांगनांचे वर्चस्व आहे. पुरुषाने लावणीच्या अदाकारी करणे सोपे नव्हे; पण या लावणीच्या ध्यासाने प्रेरित झालेल्या तालुक्यातील कासारवेली येथील लावणीसम्राट- कुणाल पाटील याला नुकताच स्वतंत्र्य कोकण राज्य अभियानाचे संजय कोकरे यांच्या हस्ते ‘कोकणरत्न पदवी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबईतील आझाद मैदान येथील पत्रकार भवन येथे हा कार्यक्रम झाला.
कुणाल गेली १७ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात लावणी नृत्य करत आहे; मात्र पुरुष लावणी नृत्यकलावंताला अद्यापही समाजाकडून तितकासा सन्मान प्राप्त झालेला नाही. कारण, यावर महिलांचे अधिराज्य आहे. त्यामुळे कुणाल काहीसा प्रसिद्धी परान्मुख राहिला. अलीकडे महाराष्ट्रभरात असे अनेक युवक लावणी नृत्यात पारंगत होताना पाहायला मिळत आहेत. राज्यात दरवर्षी अनेक ठिकाणी लावणीच्या स्पर्धा होतात. या स्पर्धांमध्येही कुणालने राज्यस्तरावर आपला ठसा उमटवला आहे तसेच जिल्ह्यातही अनेक ठिकाणी त्याचे लावणीचे कार्यक्रम होत असतात. कुणालला २०१२ ला महाराष्ट्र शासनाचा कलाश्री पुरस्कारही मिळाला आहे. या प्रवासात ‘रंग लावणीचा जल्लोष रत्नागिरी कलाकारांचा’ या नव्या बॅनरखाली त्याने सुरुवात केली. जिल्ह्यातील नवोदित नृत्यांगनांना घेऊन त्यांच्या शैक्षणिक खर्चाला हातभार लावण्याचे काम तो करत आहे. त्याच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कुणालच्या उत्तरोत्तर प्रगतीत २०२०ला महाराष्ट्र शासनाचा कलारत्न पुरस्कार, २०२१ला शासनाचा युवा कला गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. रत्नागिरीसह सातारा, मुंबई, सांगली, गोवा, पुणे या ठिकाणीही त्याने लावणीनृत्याचे कार्यक्रम केले आहेत. लावणी नृत्यक्षेत्रात मुलांनी यावे असे त्याला वाटते; पण मुलांच्या मनात अजून नकारघंटाच आहे. सध्या त्याच्याकडे लावणी शिकण्यासाठी मुले येत असून, त्याला आशेचा किरण दिसत आहे. लावणीमुळे कुणालला नोकरी मिळाली आहे. लावणी नृत्यातील योगदान लक्षात घेऊन ‘कोकणरत्न पदवी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आल्याचे कुणाल याने ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.
---
चौकट
पुरस्काराने धन्य झालो..
कोकणवासियांच्या उदंड प्रेमामुळे नृत्यक्षेत्रामधील आजपर्यंतच्या योगदानाची दखल घेतली. कोकणासह रत्नागिरीचे नाव मोठं करण्यासाठी संधी मिळाली. त्यात लावणी नृत्याचा खारीचा वाटा आहे. कोकणरत्न पदवी पुरस्कार देऊन सन्मानित केले, मी धन्य झालो, अशी प्रतिक्रिया लावणीसम्राट कुणाल पाटील याने व्यक्त केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.