जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांचा हिरेमोड
महानगरपालिकांची निवडणूक जाहीर; काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ः राज्यातील महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे; मात्र जिल्हा परिषद निवडणुकीची सर्व तयारी करूनही या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे मिनी मंत्रालयात जाण्यासाठी इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. त्यांना आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी निवडणूक विभाग व निर्वाचन गणांची अंतिम आरक्षण अधिसूचना ३ नोव्हेंबर रोजी काढण्यात आली. रत्नागिरी जिल्हा परिषदेत एकूण ५६ गट असून, त्यातील २८ गट हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. अनुसूचित जातीसाठी दोन गट असून, एक गट महिलांसाठी, अनुसूचित जमातीसाठी एक गट आरक्षित असून, तो महिलांसाठी आरक्षित झाला आहे. इतर मागासर्गीय गटासाठी (ओबीसी) १५ गट असून, त्यातील ८ गट महिलांसाठी तर सर्वसाधारण ३८ गट असून त्यातील १८ गट हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर या नऊ पंचायत समित्या असून, त्यासाठी ११२ गण आहेत. या सर्व गट व गणांचे अंतिम आरक्षण अधिसूचना जारी झाली आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे फटाके फुटणार असल्याचे गृहित धरून इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.
गेली साडेतीन महिने पायाला भिंगरी लावून प्रचार केला. मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. उमेदवारांचा मतदाराबरोबर संपर्क सुरूच आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती; पण सोमवारी महापालिकांच्या निवडणुकीचाच कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. यामुळे इच्छुकांचे लक्ष निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे लागले आहे.