शहर व परिसराचा विकास करायचा असले तर त्यासाठी निधीची आवश्यकता असते. अर्थात पैशाशिवाय कामे होत नाही. परंतु सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जवळपास २५ हजार कोटींच्या कामांना नारळ वर्षाअखेर वाढविल्याने नाशिकच्या विकासाला गती मिळणार आहे. या वर्षात ही सर्वांत मोठी उपलब्धी ठरेल. वाढवण पोर्ट, समृद्धी महामार्गाचा सुरू झालेला तिसरा फेज व घोटी ते वाढवण महामार्गाला मिळालेली मंजुरी, बाह्यवळण रस्त्याला मान्यता या बाबी विकासाचा वेग चारपटीने वाढविणारा ठरणार आहेत.
सिंहस्थ कुंभमेळा हा जसा साधुसंत व भाविकांचा मेळा असतो, तसा विकासाच्या दृष्टीने एक पर्वणीदेखील ठरते. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात भाविकांची गर्दी लक्षात घेता नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी शासनाने सढळ हाताने निधी देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे नाशिककर विकासाच्या पर्वणीचा अनुभव सध्या घेत आहेत. सिंहस्थासाठी महापालिकेने १५ हजार कोटींचा, तर महापालिकेसह अन्य विभागांचा एकत्रितरीत्या २४ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
हा आराखडा अद्याप शासनस्तरावर प्रलंबित असला तरी सिंहस्थ प्राधिकरणामार्फत सुमारे पाच हजार १४० कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत. बांधकाम विभागाने २२७० कोटींचे रस्ते काम हाती घेतले आहेत. येत्या दीड- दोन वर्षात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे नाशिकमध्ये तयार होत आहे. शहराच्या विकासात रिंगरोड महत्त्वाची भूमिका बजावतात. शासनाने परिक्रमा मार्गाला मंजुरी दिल्याने पुढील ५० वर्षांचा नाशिकच्या वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. अमृत-२ निधीतून नवीन नगरामध्ये ड्रेनेज, पावसाळी गटार वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले जात आहे.
विल्होळी येथे २७४ दशलक्ष लिटर्स क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, चार जलकुंभ, पंचवटी व गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाइपलाइन अमृतच्या निधीतून केल्या जात आहेत. जवळपास ३७५ कोटींचा हा प्रकल्प आहे. पुढील २५ वर्षांचा विचार करून पंचवटीत मलजलशुद्धीकरण प्रकल्प साकारला जात आहे. १,४७५ कोटी रुपये त्यावर खर्च केले जात आहे. शहरात १२७५ कोटी रुपये खर्च करून रस्त्यांचे व्हाइट टॅपिंग केले जात आहे. शहरात येणारे मुख्य प्रवेशद्वारावरील रस्त्यांचा विस्तार व वाहनतळ विकसित केले जात आहे. या माध्यमातून शहरातील रस्त्यांना चकाकी मिळणार आहे.
पुढील दीड-दोन वर्षात ही कामे पूर्ण होणार आहेत. नाशिकच्या विकासासाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे. कसबे-सुकेणे, ओढा रेल्वेस्थानकांचा विस्तार, नाशिक रोड स्थानकावर रेल्वे प्लॅटफार्मची लांबी वाढविणे यामुळे रेल्वेच्या विकासाला चालना मिळणार आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने रामकाल पथ, गोदाघाटांची लांबी वाढविणे, बसस्थानकाची निर्मितीसाठी कुंभमेळ्याचा निधी खर्च केला जात आहे.
औद्योगिक विकासाला चालना
शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नाशिक महानगर विकास प्राधिकरणामार्फत विकास आराखडा तयार केला जात आहे. इगतपुरी तालुक्यातील आडवण व सिन्नर तालुक्यातील मोह व चिंचोली येथे नवीन औद्योगिक वसाहतीचा उद्देश जाहीर करण्यात आल्याने औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. गोदावरी नदीवर महापालिका हद्दीत चार नवीन पुलांची निर्मिती, द्वारका चौकात अंडरपास, गोविंदनगर बोगद्याचे रुंदीकरणामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.
घोटी- त्र्यंबक रस्त्याचे विस्तारीकरणामुळे मुंबईकरांना श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचा प्रवास सोपा होणार आहे. पहिने येथे सेवन स्टार हॉटेलची मुहूर्तमेढ, शहरात ताज, मेरिएट या हॉटेलचे ब्रॅन्ड दाखल झाले. निफाड ड्रायपोर्टचे प्रलंबित कामाला मिळालेली गती, इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचा प्रारंभ, प्रवासी विमानसेवेला चालना, नवीन लढाऊ विमानांचे एचएएलला मिळालेले कंत्राट, अक्राळे औद्योगिक वसाहतीत रिलायन्स कंपनीची मुहूर्तमेढ या ठळक बाबी यंदाच्या वर्षात नाशिकच्या विकासाला बूस्टर डोस देणाऱ्या ठरल्या आहेत.
नाशिकच्या विकासाचे महत्त्वाचे प्रकल्प
ओझर विमानतळावरील धावपट्टीला समांतर नवीन धावपट्टी
‘एचएएल’मार्फत प्रवासी व लढाऊ विमानांची देखभाल दुरुस्ती
वाढवण पोर्ट ते समृद्धी महामार्ग (घोटी) दरम्यान नवीन द्रुतगती
VIDEO : 'गावातील अंबानी शेतकऱ्याचं घर'! 20 एकरातील आलिशान घर पाहून नेटकरीही थक्क; गाड्यांपासून घोड्यांपर्यंत सर्व काही इथे आहे...मार्गाला मंजुरी
इगतपुरी ते आमने दरम्यान समृद्धी महामार्गाचा तिसरा फेज खुला
१४५ कोटींचा रामकाल पथ.
सिंहस्थ परिक्रमा मार्गाला (बाह्यवळण रस्ता) मंजुरी
गोवा, बंगळूर, दिल्ली, अहमदाबाद विमानसेवेला गती
नाशिक-त्र्यंबक रस्त्याचे काँक्रिटीकरण
नाशिक-पुणे रेल्वेमार्ग (अहिल्यानगर मार्गे) मंजुरी