रायगड डाक विभाग देशपातळीवर ठरला अव्वल
डाक विभागाच्या विविध योजनांचा नागरिकांना लाभ
अलिबाग, ता. १७ (वार्ताहर) : केवळ पत्रव्यवहारापुरता मर्यादित न राहता सामान्य नागरिकांच्या भवितव्याला सुरक्षित करणाऱ्या बचत व विमा योजनांच्या माध्यमातून भारतीय डाक विभाग सामाजिक बांधिलकी जपत आहे. सुमारे ९० टक्के ग्रामीण भाग असलेल्या रायगड जिल्ह्यात विमा व बचतीबाबत पूर्वी मर्यादित प्रतिसाद होता, मात्र योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी कार्यामुळे रायगड डाक विभागाने देशपातळीवर अव्वल स्थान पटकावले आहे.
डाक विभागाकडून दरमहा ठरावीक दिवशी राबविण्यात येणाऱ्या ‘लॉगिन डे’ उपक्रमांतर्गत अधिकाधिक नागरिकांपर्यंत विमा संरक्षण पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला. रायगडचे डाक अधीक्षक सुनील थळकर यांनी ‘आमची कामगिरी आकड्यांसाठी नाही, ती सेवेची आहे’ हा मंत्र कर्मचाऱ्यांना देत सेवाभावी दृष्टिकोनातून कामगिरीचा नवा मापदंड उभा केला. जास्तीत जास्त लोकांचे भले कसे करता येईल, या विचारातून कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास, अभिमान आणि आत्मविश्वास निर्माण झाला.
गेल्या वर्षी बचत खात्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद कामगिरी केल्यानंतर, यावर्षी ‘विमा ही काळाची गरज आहे’ या संकल्पनेवर भर देत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. यामध्ये पोस्टल लाइफ इन्शुरन्स आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजनांचा प्रभावी प्रसार करण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, कामगार आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना कमी हप्त्यात सुरक्षित विमा संरक्षण मिळावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम म्हणून रायगड डाक विभागाने एका दिवसात विक्रमी कामगिरी नोंदवत देशपातळीवर आपले स्थान अधोरेखित केले आहे.
चौकट
रायगडची एकदिवसीय कामगिरी :
१. प्रीमियम कलेक्शन : ५७, ४२, ३११ रुपये
२. सम ॲश्युरन्स : २६, ५१,२५,००० रुपये
३. पॉलिसी संख्या : १०२४