पिंपळे गुरव, ता. १७ ः पिंपळे गुरव येथील शेल पेट्रोल पंपासमोरील मोकळ्या जागेत दर रविवारी भरल्या जाणाऱ्या आठवडे बाजारामुळे परिसरातील रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून पादचारी व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी उभ्या केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे मार्ग अरुंद होत असून लहान-मोठे अपघात घडत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
रविवारी सायंकाळच्या सुमारास आठवडे बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याने फेरीवाल्यांचे स्टॉल पदपथावर व अंशतः रस्त्यावर येतात, तर ग्राहकांची वाहने सर्रास मुख्य रस्त्यावर उभी केली जातात. मोटारी, रिक्षा आणि दुचाकीच्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे एकाच लेनमधून वाहतूक सुरू राहते आणि थोड्याशा निष्काळजीपणानेही धडक, घसरून पडणे असे प्रसंग वारंवार घडतात.
आठवडे बाजाराला महापालिकेकडून कोणतीही औपचारिक परवानगी नसताना हा बाजार उघडपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने व कायदेशीर परवानग्या पाहणाऱ्या विभागाकडून या बाजारांविरोधात कारवाई का टाळली जाते, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
ड प्रभागावरील प्रश्नचिन्ह
ही संपूर्ण जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येत असून, आठवडे बाजाराचे अनधिकृतपणे सुरू असलेले संचालन व रस्त्यावरची पार्किंग याकडे प्रभाग कार्यालय जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. वारंवार तक्रार करूनही अतिक्रमण व पार्किंगविरोधातील मोहीम राबवली जात नसल्याने ड प्रभागाच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
वाहतूक पोलिस नेमण्याची मागणी
सांगवी वाहतूक शाखेने रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने, बेकायदेशीर पार्किंग व बाजारामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीविरोधात तत्काळ दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आठवडे बाजार भरविण्यासाठी स्थायी पर्यायी जागा निश्चित करून तेथेच बाजार हलविणे, तसेच शेल पेट्रोल पंपासमोरील या रस्त्यावर कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वाहतुकीला कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही. अशा प्रकारे ग्राहकांनी व व्यापाऱ्यांनी वाहने पार्क करावीत. वाहतुकीस अडथळा होत असल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
-सुदाम पाचोरकर, पोलिस निरीक्षक, सांगवी वाहतूक
सर्व बिट निरीक्षक हे निवडणूक कामात आहेत. तरीसुद्धा मी अतिक्रमण टीमला सूचना देते. कारवाई करण्यात येईल.
-अश्विनी गायकवाड, ड प्रभाग अधिकारी, महापालिका
ग्राहकांनी वाहने सरळ रस्त्यावर उभी केल्यामुळे गाड्यांची प्रचंड कोंडी होते. थोडंसं दुर्लक्ष झालं तरी दुचाकी घसरते, रिक्षा धडकतात, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना तर जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. महापालिकेच्या ड प्रभागाने आणि सांगवी वाहतूक शाखेने इथे येऊन प्रत्यक्ष पाहिले तर परिस्थिती किती भीषण आहे हे लक्षात येईल; पण वारंवार तक्रारी करूनही कोणीच कारवाई करत नाही.
-संतोष राजपूत, वाहन चालक