Manikrao kokate : माणिकराव कोकाटेंना मोठा धक्का, क्रीडा खातंही काढलं, आता कोकाटे बिनाखात्याचे मंत्री
Tv9 Marathi December 18, 2025 02:45 PM

मोठी बातमी समोर येत आहे, नाशिक सत्र न्यायालयानं मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं, त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्याकडून क्रीडा मंत्रालय देखील काढण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेलं खात काढण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस केली होती, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शिफारशीनंतर आता कोकाटे यांच्याकडे असलेलं क्रीडा मंत्रालयाचा पदभार काढण्यात आला आहे.  नाशिकमधील सदनिका गैरव्यवहार प्रकरण माणिकराव कोकाटे यांना चांगलंच भोवलं आहे, हे प्रकरण 1995 सालचं आहे, या प्रकरणात कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्यानंतर आता नाशिक सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वारंट जारी केलं आहे, शिक्षेला स्थगिती देण्यात यावी यासाठी माणिकराव कोकाटे यांनी आज उच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती, मात्र न्यायालयानं या प्रकरणावर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला. हाय कोर्टाकडून देखील कोकाटे यांना दिलासा मिळाला नाही. सध्या कोकाटे हे लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत, दरम्यान  दिवसभरात घडलेल्या घडामोडींनंतर अखेर आता त्यांच्याकडून क्रीडा मंत्रालयाचा पदभार काढून घेण्यात आला आहे.

कोकाटे यांचं मंत्रिपद काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे शिफारस केली होती. कोकाटे  यांच्याकडून क्रीडा मंत्रालयाचा पदभार काढल्यानंतर आता  क्रीडा खातं कोणाला दिलं जाणार याबाबत देखील उत्सुकता निर्माण झाली होती, यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की त्याबद्दलचा निर्णय हे उपमुख्यमंत्री अजित पवारच घेतील, त्यामुळे आता कोकाटे यांच्याकडे असलेल्या क्रीडा मंत्रालयाचा पदभार अजित पवार यांच्याकडे आला आहे.

दरम्यान यापूर्वी देखील माणिकराव कोकाटे यांच्यावर सभागृहात मोबाईलवर रम्मी गेम खेळल्याचा आरोप करण्यात आला होता, यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला होता, तेव्हा देखील माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती, मात्र तेव्हा त्यांचा राजीनामा घेण्यात आला नव्हता तर मंत्रिपद बदलण्यात आलं होतं, त्यांच्याकडे पूर्वी कृषी खातं होतं, कृषी खात्याचा पदभार काढून त्यांच्याकडे क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली होती, मात्र यावेळी  आता त्यांच्याकडून क्रीडा मंत्रालयाचा पदभार देखील काढून घेण्यात आला आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून जरी खातं काढून घेण्यात आलेलं असलं तरी त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाहीये.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.