ऊसतोड यंत्रामध्ये सापडून दोन महिला मजुरांचा अंत; ऊस गोळा करताना दुर्घटना, हृदय पिळवटून टाकणारा कुटुंबीयांचा आक्रोश
esakal December 18, 2025 05:45 PM

अथणी : यंत्राद्वारे उसाची तोडणी सुरू असताना त्यात सापडून दोन महिला मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना सत्ती (ता. अथणी) येथे बुधवारी (ता. १७) दुपारी घडली. बौरव्वा लक्ष्मण कोबडी (वय ६०) व लक्ष्मीबाई मल्लप्पा रुद्रगौडर (वय ६५, दोघीही रा. सत्ती, ता. अथणी) अशी यंत्रामध्ये सापडून ठार (Sugarcane Harvester Accident) झालेल्या महिलांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, सत्ती गावाच्या बाहेरील शेतात ऊस तोडणीचे काम सुरू होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ऊसतोड यंत्राच्या मागील बाजूस तुटलेला ऊस गोळा करण्याचे काम बौरव्वा व लक्ष्मीबाई करत होत्या. अचानक त्या ऊसतोड यंत्रात अडकल्या. यंत्र बंद करण्यापूर्वीच दोघींना गंभीर इजा होऊन जागीच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शेतात काम करणाऱ्या इतर मजुरांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेनंतर मृत महिलांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दोन महिला मजुरांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

धक्कादायक! सांगलीतील ईश्वरपुरात अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार; तोंड दाबून धरलं आणि हॉस्पिटल मागच्या उसाच्या शेतात नेत...

घटनेची माहिती मिळताच अथणी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. ही घटना अथणी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडली असून, याबाबत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अथणी पोलिस करीत आहेत. दरम्यान, ऊस तोडणीदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजना पाळण्यात दुर्लक्ष झाल्याने असा दुर्दैवी प्रकार घडल्याची चर्चा आहे. शेतमजुरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी होत आहे.

ऊसतोडीसाठी वापरण्यात येणारे यंत्र (हार्वेस्टर) शेतात काम सुरू असताना त्याचा आवाज अधिक असतो. यंत्राच्या चालकाला मागील व पुढील भागाचा अंदाज येत नाही. सरीतून ऊस तोडताना व मशीन मागे घेताना शेतकरी यंत्राच्या मागे राहिलेला ऊस गोळा करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांना यंत्राचा आवाज उसाच्या फडात कामावेळी येत नसल्याने अशा घटना घडत आहेत.

दुसरी घटना, तीन मृत्यू

अथणी तालुक्यात गेल्या महिन्यात ऊसतोड यंत्रामध्ये सापडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. सप्तसागर येथे २१ नोव्हेंबरला ही घटना घडली होती. महिन्यात दुसरी घटना घडताना आतापर्यंत तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेची तालुक्यात पुन्हा आठवण ताजी झाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.