ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्याला वादाची फोडणी मिळाली आहे. या सामन्याचा दोन दिवसांचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 371 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 8 गडी गमवून 213 धावांपर्यंत मजल मारू शकला आहे. अजूनहाी इंग्लंडचा संघ 158 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या खेळावरही कांगारूंची पकड मजबूत आहे. पण पहिल्या दिवसासारखंच दुसऱ्या दिवसालाही वादाची किनार लाभली आहे. खरं तर ऑस्ट्रेलिया इंग्लंड हे संघ जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाही. पण यावेळी दोन्ही एकाच त्रासाला सामोरं जात आहे. हा त्रास दुसरा तिसरा कसला नाही तर स्निकोमीटरचा आहे. इंग्लंडच्या डावात मिचेल स्टार्कने स्निकोमीटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
स्निकोमीटरच्या मदतीने पंचांना निर्णय घेण्यास मदत होते. पण यावेळी भलताच निकाल देत असल्याचं दिसून आलं आहे. सामन्याच्या दोन्ही दिवशी स्निकोमीटरने चुका केल्या आणि त्याचा फटका दोन्ही संघांना बसला. पहिल्यांदा इंग्लंडला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियालाही त्याच त्रासाला सामोरं जावं लागलं. ऑस्ट्रेलियाच्या डावात एलेक्स कॅरीच्या विकेटवेळी वाद झाला होता. चेंडू पास होण्यापूर्वी स्निकोमीटरमध्ये नोंद झाली होती. पण प्रत्यक्षात बॅट जवळ आल्यानंतर मात्र काहीच दिसलं नाही. त्यामुळे त्याला नाबाद दिलं गेलं.
इंग्लंडच्या डावातही असंच घडलं. जेमी स्मिथ फलंदाजी करत असताना वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स गोलंदाजी करत होता. त्यावेळी जेमी स्मिथच्या ग्लव्हजला लागून चेंडू स्लिपला असलेल्या खेळाडूकडे गेला. त्याने कोणतीही चूक न करता हा झेल पकडला. पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचाकडे पाठवला. तेव्हा या विकेटचा निर्णय भलताच लागला. स्निकोमीटरमध्ये आवाजच नोंदवला गेला नाही. त्यामुळे पंचांनी नाबाद असल्याचं घोषित केलं. या निर्णयानंतर मिचेल स्टार्कचा पारा चढला.
मिचेल स्टार्कने स्निकोमीटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसेच हे तंत्रज्ञान खराब असल्याचं सांगत हटवण्याची मागणी केली. स्टार्क जे काही बोलला ते स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं. स्टार्कने सांगितलं की, ‘स्निकोला काढून टाकलं पाहीजे. याने कालही चूक केली होती. आजही चूक केली आहे.’