Sangli Election : ५२९ इच्छुक, ७८ जागा आणि महायुतीचा तिढा; सांगली भाजपसमोर मोठी कसोटी
esakal December 19, 2025 12:45 PM

सांगली : भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवारी (ता. १४) झाल्या आणि सोमवारी (१५) महापालिका निवडणूक जाहीर झाली. एकीकडे महायुती म्हणून निवडणूक लढण्याचे सांगत असतानाच दुसरीकडे भाजपने सर्व प्रभागांसाठी मुलाखती घेतल्या.

आता घटकपक्षांबरोबरच पक्षांतर्गत गटांमध्ये समन्वय ठेवून उमेदवारी देण्याचे आव्हान भाजप नेत्यांसमोर आहे. भाजपने घेतलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी तब्बल ५२९ इच्छुक उपस्थित होते, तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनाही काही जागा द्याव्या लागणार आहेत.

Kalyan Politics कल्याण भाजपाच्या रडारवर ! 'डोंबिवली नंतर कल्याणात सर्जिकल स्ट्राईक'; शिंदे सेना-ठाकरे गटात खळबळ

त्यामुळे महापालिकेच्या ७८ जागांसाठी उमेदवारी वाटप कसे होणार, असा प्रश्न भाजप नेत्यांसोबतच कार्यकर्त्यांसमोरही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) तब्बल ३० जागांची, तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाने २० जागांची मागणी केली आहे.

मात्र त्याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. अर्थात, एवढ्या जागा त्यांना मिळणार नाहीत, हे उघड आहे. परंतु जागा वाटपात कोणत्या जागा सोडायच्या, यावरूनच रुसवे-फुगवे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Ichalkaranji Election : महापालिका निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग; भाजप-मविआकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू महायुतीची बैठक अद्याप नाही

२०१८ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाने ४१ जागा जिंकून बहुमतासह सत्ता स्थापन केली होती. मात्र अडीच वर्षांत राज्यातले सरकार बदलल्यानंतर महापालिकेतही सत्तांतर झाले. त्यावेळी भाजप नेत्यांना धक्का बसला.

त्यानंतर राज्याबरोबरच महापालिकेतही राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटली. फुटलेले दोन्ही गट भाजपसोबत महायुती म्हणून गेले आहेत. शिवाय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), तसेच जनसुराज्य हेही पक्ष यात आहेत.

भाजप नेतेही ‘महायुती’ असा सगळीकडे उल्लेख करत असले, तरी बऱ्याच वेळा महायुतीचे घटकपक्ष त्यांच्यासोबत दिसत नाहीत. शिवाय महापालिका निवडणुकीबाबत अद्याप त्यांच्यात एकही बैठक झालेली नाही.

मुलाखतींवर गटाचा प्रभाव

दुसरीकडे, भाजपने घेतलेल्या मुलाखतींना मिळालेला प्रतिसाद अपेक्षित होता. कारण भाजप म्हणजे विजयाचे समीकरण, असे गृहीत असल्याने इच्छुकांनी मुलाखतीसाठी गर्दी केली. मात्र यावर प्रभाव राहिला तो अंतर्गत गटांचा.

ठराविक प्रभागांवर विशिष्ट नेत्यांचा प्रभाव असल्याने अमुक एका वॉर्डात ठराविक नेत्यांचा शब्द चालणार, अशीच भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे अंतर्गत गटबाजीचा मुद्दाही भाजप नेत्यांसमोर डोकेदुखी बनण्याची चिन्हे आहेत.

नवीन नेत्यांचाही प्रभाव राहणार

भाजपमध्येच गेल्या सहा महिन्यांत आलेल्या नवीन नेत्यांचाही उमेदवार निवडीवर प्रभाव राहणार असल्याचे स्पष्ट आहे. जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील हे भाजपमध्ये अलीकडेच दाखल झाले आहेत. यात जयश्री पाटील यांचा गट मोठा आहे. त्यामुळे अनेक प्रभागात भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. उमेदवारी कशी मिळवायची, असा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

बंडखोरीचाही प्रश्न

भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच आपल्या नेत्यांना गळ घालण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या संख्येने असलेल्या इच्छुकांतून नाराज झालेले कार्यकर्ते काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसमोर बंडखोरीचाही प्रश्न निर्माण होणार आहे.

नेत्यांचे कसब पणाला

या सगळ्या आव्हानांवर भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, तसेच जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज पवार हे नेते कशी मात करणार, हे औत्सुक्याचे ठरेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.