Akola News: शेतकऱ्यांच्या ९६ तक्रारीत सावकार दोषी; शेकडो अवैध सावकार चौकशीचा जाळ्यात
esakal December 19, 2025 12:45 PM

अकोला : जिल्ह्यात अवैध सावकारांच्या जाचामुळे शेतकरी आत्महत्या होत असतानाच विविध कर्जदात्यांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने शेकडो सावकारांवर जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाअंतर्गत चौकशी सुरू आहे.

त्यापैकी ऑक्टोबर अखेरपर्यंत कर्जदात्यांकडून प्राप्त ९६ तक्रारींमध्ये सावकार दोषी सिद्ध झाले असून, त्यांच्याकडून आठ कोटी २६ लाख २० हजार रुपयांची मालमत्ता कर्जदात्यांना परत करण्यात आली आहे.

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या विदर्भात, त्यातही अकोला जिल्ह्यात होत असल्याचे समोर आले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्येच्या संख्येला विविध कारणे असले तरी, सावकारांच्या जाचाला कंटाळून होणाऱ्या आत्महत्यांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयांतर्गत अकोला जिल्ह्यात नोंदणीकृत सावकारांची संख्या १९४ आहे.

मात्र, नोंदणीकृत नसलेल्या अशा शेकडो अवैध सावकारांचे जाळे जिल्ह्यात पसरलेले आहे. त्यातूनच २०२५ च्या ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्हाभरातून कलम १६ च्या २५५ तर, कलम १८ (१) च्या ३०५ तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्यापैकी कलम १६ च्या २२१ तर, कलम १८ (१) च्या २११ तक्रारी चौकशीधीन असून, एकूण ९६ तक्रारींमध्ये दोष सिद्ध झाल्याची व ३५९ तक्रारी चौकशीधीन असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

सव्वाआठ कोटींची मालमत्ता परत

जिल्ह्यांतर्गत कर्जदात्यांकडून वर्षभरात प्राप्त ५६० तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करताना कलम १६ च्या ५० तर, कलम १८ (१) च्या ४६ तक्रारी दोषी आढळून आल्या. त्यामुळे संबंधित दोषी सावकारांनी घशात घातलेल्या ४२ प्रकरणांमध्ये १५१.६४ एक्कर जमीन व ४७७६ चौ. फूट जागा, एक राहता फ्लॅट, अशी एकूण आठ कोटी २६ लाख २० हजार रुपये किंमतीची मालमत्ता ऑक्टोबरअखेरपर्यंत कर्जदात्यांना परत देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून देण्यात आली.

Akola: पंचवीस वर्षांत सव्वा तीन हजार शेतकऱ्यांनी दिला जीव! मायबाप सरकार लक्ष देईल काय; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांचा टाहो

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या

तालुका चालू वर्षात (२०२५) मागील २५ वर्षात

  • अकोला ३७ ७५०

  • बार्शीटाकळी १३ ४६३

  • अकोट २६ ४७२

  • तेल्हारा ११ ३६८

  • बाळापूर १९ ३५१

  • पातूर २७ ४०५

  • मूर्तिजापूर २७ ४६८

  • एकूण १६० ३,२७७

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.