Nashik Marathi Vishwa Sammelan : नाशिकमधील 'मराठी विश्व संमेलन' लांबणीवर; जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत रंगणार सोहळा!
esakal December 19, 2025 12:45 PM

नाशिक: शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे २६, २७ व २८ डिसेंबरला नियोजित चौथ्या मराठी विश्र्व संमेलनाच्या आता नव्याने तारखा जाहीर होणार आहेत. निवडणुकांची रणधुमाळी व विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात अधिकारी वर्ग अडकल्याने संमेलनाचे नियोजन बारगळले. जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात संमेलन होणार असल्याची माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे यांनी दिली.

संमेलनाच्या कामकाजाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, शासन निर्णय निर्गमित झाल्यावर संमेलनाच्या नवीन तारखा लगेचच जाहीर केल्या जाणार आहेत. परदेशातील मराठी नागरिक डिसेंबरअखेरीस महाराष्ट्रात सुटी व्यतीत करण्यासाठी येतात.

त्यांना डोळ्यांसमोर ठेवून डिसेंबरमधील तारखांची निश्चिती करण्यात आली होती; परंतु ज्यांना संमेलनात खऱ्या अर्थाने सहभागी व्हायचे आहे, ते कोणत्याही प्रकारे सहभागी होतात. त्यामुळे बदललेल्या तारखांमुळे संमेलनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे डॉ. देवरे यांनी सांगितले.

दरम्यान, गंगापूर रोड येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या प्रांगणात होणारे संमेलन काही दिवसांवर येऊन ठेपले असल्याने संमेलनाची पत्रिका व पाहुणे मंडळींची अद्याप निश्चिती न झाल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. संमेलन रद्दच होते की काय, अशीही चर्चा साहित्य वर्तुळात सुरू झाल्याने अखेर संमेलनाचे डिसेंबरमधील नियोजन फिसकटले आहे. नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.

Indian Destinations 2026: नवीन वर्षाची सुरुवात करा धमाकेदार! भारतातील ‘ही’ 6 ठिकाणं 2026 मध्ये मिस करू नका

मराठी विश्व संमेलन रद्द झाले नसून, ते नाशिकलाच होणार आहे. याबाबत कोणत्याही अफवा न पसरविता निवडणुकांमुळे संमेलनाच्या तारखांमध्ये बदल करण्यात येईल.

- डॉ. श्यामकांत देवरे, संचालक, राज्य मराठी विकास संस्था

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.