चुकीचा दरवाजा ठोठावल्याने अनर्थ घडला! आधी बळजबरीने बिअर पाजली, नंतर रात्रभर तिघांनी तिला… संभाजीनगर हादरलं
Tv9 Marathi December 19, 2025 05:45 PM

छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्टेशन परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये ३० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. केवळ चुकीच्या खोलीचा दरवाजा वाजवल्याच्या कारणावरून ३० वर्षीय विवाहित महिलेवर तिघांनी सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी वेदांत नगर पोलिसांनी तातडीने हालचाली करत अवघ्या तीन तासांत तिन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

पीडित महिला ही मूळची भोकरदन येथील रहिवासी आहे. तिला तातडीच्या कामासाठी पैशांची नड होती. त्यामुळे तिने छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या आपल्या एका ओळखीच्या मित्राशी संपर्क साधला. त्या मित्राने तिला रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. यावेळी तिने आणि तिच्या मित्राने हॉटेलमध्ये रुम नंबर १०५ आरक्षित केली होती. तिथे दोघांनी जेवण आणि मद्यप्राशन केले आणि काही वेळ चर्चा केली. रात्रीच्या सुमारास ही महिला हॉटेलच्या बाहेर काही कामासाठी गेली. परत येत असताना, ती चुकून दुसऱ्या मजल्यावर पोहोचली.

त्याच या गोंधळात तिने १०५ समजून रुम नंबर २०५ चे दार वाजवले. रुम नंबर २०५ मध्ये तीन तरुण आधीच मद्यप्राशन करत बसले होते. दार वाजल्याचे पाहून त्यांनी दरवाजा उघडला. समोर एका महिला असल्याचे पाहून त्यांच्यातील नराधम जागा झाला. त्यांनी काहीही विचार न करता महिलेला जबरदस्तीने खोलीच्या आत खेचले. तिने प्रतिकार केला असता तिला मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

यानंतर आरोपींनी पीडितेला बळजबरीने बिअर पाजली. जेणेकरून ती शुद्ध हरपून बसेल. त्यानंतर पहाटेपर्यंत त्या तिघांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. पहाटे ४ च्या सुमारास आरोपी गाढ झोपेत असताना पीडितेने हिंमत एकवटली आणि तिथून पळ काढला. तिने थेट जवळच असलेल्या वेदांत नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला.

या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने तात्काळ हॉटेलवर धाड टाकली. आरोपी हॉटेल सोडून पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा केले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.