ज्येष्ठ नागरिक निवारा शेड बनलाय गेमिंग झोन?
सानपाडा येथील सह्याद्री कट्ट्यावर ज्येष्ठांची नाराजी
जुईनगर, ता. १८ (बातमीदार) ः सानपाडा सेक्टर ३ येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेला निवारा शेड व आसन व्यवस्था सध्या तरुण विद्यार्थ्यांच्या गेमिंग झोनमध्ये रूपांतरित झाल्याने परिसरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सानपाडा रेल्वे स्थानकासमोरील भागात ज्येष्ठ नागरिकांना निवांत बसता यावे, वर्तमानपत्र वाचता यावे, तसेच परस्पर गप्पा मारता याव्यात, या उद्देशाने ‘सह्याद्री कट्टा’ उभारण्यात आला आहे. दररोज सकाळ-संध्याकाळी सुमारे ९ ते १० ज्येष्ठ नागरिक येथे नियमितपणे येत असतात, मात्र सध्या या ठिकाणी जवळच्या सेक्टर २ मधील ओरिएंटल महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने जमा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महाविद्यालयात न जाता किंवा सुट्टीनंतर अनेक विद्यार्थी येथे येऊन रिकाम्या आसनांवर बसून मोबाईलवर विविध गेम खेळत वेळ घालवत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जागाच उरत नाही, अशी तक्रार केली जात आहे. गेम खेळताना एकमेकांशी जोरजोरात बोलणे, अपशब्द वापरणे व गोंधळ घालणे यामुळे शांत वातावरणाचा भंग होत असल्याचेही ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक वेळा ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती गृहीत न धरता मुला-मुलींचे घोळके येथे जमा होतात व धिंगाणा घालतात. परिणामी निवांतपणा, शांतता व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून, ज्येष्ठांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सेक्टर २, ३ आणि ४ परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी हा कट्टा महत्त्वाचा आधार असताना, सध्याच्या परिस्थितीमुळे तेथील मूळ उद्देशच धूसर होत चालला आहे. या प्रकाराबाबत स्थानिक समाजसेवक, लोकप्रतिनिधी तसेच संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून केली जात आहे. बेशिस्त व टवाळखोर विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवून ‘सह्याद्री कट्टा’ पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित व शांत ठिकाण बनवावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.