आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंजाब किंग्सला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव झाल्याने जेतेपदाचं स्वप्न भंगलं. असं असताना पंजाब किंग्स पुन्हा एकदा जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून मैदानात उतरणार आहे. यासाठी मिनी लिलावात संघांची बांधणी पूर्ण करण्यात आलं आहे. आयपीएल 2026 मिनी लिलावात पंजाब किंग्सने ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू कूपर कॉनोली याच्यावर डाव लावला होता. त्याच्यासाठी 3 कोटींची रक्कम मोजली होती. आता निर्णय योग्य होता असंच म्हणावं लागेल. कारण कूपर कॉनोलीने बिग बॅश लीग स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. बिग बॅश लीग 2025-2026 च्या एका सामन्यात पर्थ स्कॉर्चर्स आणि ब्रिस्बेन हीट हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात त्याने वादळी खेळी केली.
ब्रिस्बेन हीटने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पण हा निर्णय अंगाशी आलं असंच म्हणावं लागेल. पर्थ स्कॉर्चर्सच्या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. संघाने 20 षटकात 6 गडी गमवून 257 धावा केल्या. यात कूपर कॉनोलीचे योगदान महत्त्वाचं ठरलं. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला आणि वादळी खेळी केली. त्याने 37 चेंडूत 77 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 208 पेक्षा जास्त होता. यात 6 चौकार आणि 6 षटकार होते. यात त्याने चौकार षटकार मारत 60 धावा केल्या. त्याची ही खेळी पंजाब किंग्ससाठी दिलासादायक ठरली. कारण आयपीएल लिलावात खरेदी केल्यानंतर कूपर पहिल्यांदाच सामना खेळण्यास उतरला होता. त्याच्या खेळीमुळे त्याच्यासाठी लावलेली बोली योग्यच ठरली असं म्हणावं लागेल.
पंजाब किंग्सने या लिलावात फक्त चार खेळाडू खरेदी केले आणि आपला संघ बांधला. यात कूपर कॉनोलीचं नाव होतं. त्याने या पर्वातील पहिल्या सामन्यात 31 चेंडूत 59 धावा केल्या होत्या. तसेच फॉर्मात असल्याचे संकेत दिले. दुसरीकडे, न्यूझीलंडचा स्टार फिन एलनने देखील वादळी खेळी केली. त्याला केकेआरने विकत घेतलं आहे. त्याने 38 चेंडूत 79 धावा केल्या. यात 3 चौकार आणि 8 षटकार मारले.