अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पावसाच्या व्यत्ययामुळे 50 षटकांचा सामन्यात खेळखंडोबा झाला. खेळपट्टी ओली असल्याने हा सामना 20 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेला. श्रीलंकेकडून विरन चामुदिथा आणि डुलनिथ सिगेरा ही जोडी मैदानात आली. पण संघाच्या 15 धावा असताना डुलनिथ सिगेरा हा 1 धाव करून बाद झाला. किशन कुमार सिंगने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर संघाच्या 25 धावा असताना विरन चामुदिथाच्या रुपाने दुसरा धक्का बसला. 19 धावांवर असताना दीपेश देवेंद्रनने त्याला तंबूत पाठवलं. त्यानंतर आला कविजा गमागे हा देखील काही खास करू शकला नाही. 2 धावा केल्यानंतर धावचीत होत तंबूत जाण्याची वेळ आली. वेदांत त्रिवेदीने त्याला धावचीत केलं. संघाची स्थिती नाजूक असताना कर्णधार विमथ दिनसारा आणि चमिका हीनाटीगाला यांनी डाव सावरला. चौथ्या विकेटसाठी या दोघांनी मिळी 45 धावांची भागीदारी केली.
विमथ दिनसारा 29 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 32 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेले किथ्मा विथानापथिरणा आणि आधम हिल्मी हे पण काही खास करू शकले नाहीत. त्यांच्या विकेट झटपट गेल्याने संघावर दडपण वाढलं. पण सातव्या विकेटसाठी चमिका हीनाटीगाला आणि सेठमिका सेनेविरत्ने चांगली भागीदारी केली. या दोघांनी 40 चेंडूत 50 धावा केल्या. सेठमिका सेनेविरत्ने याने 22 चेंडूत 2 चौकार आणि एक षटकार मारत 30 धावा केल्या. तर चमिका हीनाटीगाला याने 38 चेंडूत 3 चौकार मारत 42 धावा केल्या. भारताकडून हेनिल पटेल आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी दोन विकेट काढल्या. तर किशन कुमार सिंग, दीपेश देवेंद्रन आणि खिलन पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
श्रीलंकेने 20 षटकात 8 गडी गमवून 138 धावा केल्या आणि विजयासाठी 139 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हे आव्हान गाठल्यानंतर टीम इंडियाला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. पण या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला पहिला धक्का बसला आहे. संघाच्या 7 धावा असताना आयुष म्हात्रे बाद झाला. त्याने 8 चेंडूत 7 धावा केल्या आणि बाद झाला. आता सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीच्या खेळीकडे लागून आहे.