नारायणगाव - इंडियन मिलिटरी ॲकॅडमी डेहराडून (आयएमए) येथून सैन्य दलाचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील अजिंक्य मेहेर यांनी लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल अजिंक्य आणि त्यांच्या पालकांचे नारायणगाव, वारूळवाडी परिसरात कौतुक होत आहे.
अजिंक्य हा कुशाग्र बुद्धीचा आहे. इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा व राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले होते. दहावीच्या परीक्षेत त्याला ९५.६० टक्के, तर बारावीत त्याने ९२ टक्के गुण प्राप्त केले होते. त्याचे शिक्षण अहिल्यानगर येथील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून झाले.
वडील संजय हे उपशिक्षणाधिकारी तर जयश्री मेहेर या शिक्षिका असल्यामुळे त्याला योग्य मार्गदर्शन मिळाले. बारावीला असताना एनडीए च्या प्रवेशासाठी त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. ही परीक्षा दिलेल्या देशातील सहा लाख विद्यार्थ्यांमधून ३५० विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत तयार करण्यात आली. या यादीत तो देशात ११५ व्या रँकनी उत्तीर्ण झाला होता. खडकवासला एनडीए येथे त्याला प्रवेश मिळाला.
खडकवासला एनडीए येथून तीन (२०२२ ते २०२४) वर्षांचा अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण केल्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये त्याची इंडियन मिलिटरी ॲकॅडमी डेहराडून येथे भारतीय सैन्य दलाच्या पुढील खडतर ऑफिसर प्रशिक्षणासाठी निवड झाली.
१३ डिसेंबर २०२५ रोजी हे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेची शपथ घेऊन अजिंक्य लेफ्टनंट या पदावर देश सेवेसाठी रुजू झाला. इंडियन मिलिटरी ॲकॅडमी डेहराडून येथे प्रशिक्षण घेऊन लेफ्टनंटपदी निवड झालेला अजिंक्य हा वारुळवाडी परिसरातील पहिलाच तरुण आहे.
आई-वडील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने लहानपणापासूनच घरातून योग्य संस्कार मिळाले. देश सेवेसाठी योगदान द्यावे अशी माझी लहानपणापासूनच इच्छा होती. मी आता देश सेवेसाठी सज्ज झालो आहे. माझ्या यशात आई-वडील व शिक्षकांचे मोठे योगदान आहे.
- अजिंक्य मेहेर, लेफ्टनंट