IND vs SA: अभिषेक शर्माने चौकार षटकारांसह चांगली सुरुवात केली, पण तीच चूक करत केलं नुकसान
Tv9 Marathi December 20, 2025 07:45 AM

भारताचा स्टार आणि आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा समोर असला की भल्याभल्यांना घाम फुटतो. कारण त्याची आक्रमक शैली सामन्याचं रूप पालटू शकते. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी करावी लागली. दुसऱ्या डावात दव पडणार हे माहिती असल्याने मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान होतं. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी मैदानात उतरली आणि त्यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. अभिषेक शर्माने आपला आक्रमक बाणा दाखवला. सुरुवात तर चांगली केली, पण मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. बाद झाल्याने भारताच्या धावगतीला ब्रेक लागला. कारण अभिषेक शर्मा मैदानात असता तर कदाचित आणखी धावा जोडल्या गेल्या असत्या. अभिषेक शर्माने दुसऱ्या षटकात सलग तीन चेंडूवर तीन चौकार मारले. तर सहाव्या षटकात कॉर्बिन बॉशच्या चेंडूवर षटकार मारला. पण त्यानंतर त्याला तंबूत परतावं लागलं.

कॉर्बिन बॉशच्या गोलंदाजीवर षटकार मारल्यानंतर त्याने प्रभावी अस्त्र बाहेर काढलं. कारण गेल्या काही सामन्यात अभिषेक शर्मा बाउंसर मारताना बाद होत असल्याचं दिसून आलं आहे. त्याने आखुड टप्प्याचा चेंडू टाकला. हा चेंडू मारताना अभिषेकने भात्यातून पुल शॉट काढला. पण त्यात त्याला यश आलं नाही. पंचाने त्याला बाद घोषित केलं. अभिषेकने त्यासाठी डीआरएस घेतला. तिसऱ्या पंचांनी व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासली तेव्हा अभिषेकच्या ग्लव्ह्सला चेंडू घासून विकेटकीपर क्विंटन डिकॉकच्या हातात गेला. पंचांचा हा निर्णय योग्य ठरला.

अभिषेक शर्मा 21 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार मारला. आखुड टप्प्याच्या चेंडूवर आक्रमक खेळताना बाद होत असल्याचं कांगारूंच्या गोलंदाजांनी हेरलं होतं. आता हे स्ट्रॅटर्जी दक्षिण अफ्रिकेचे गोलंदाज वापरत असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे, अभिषेक शर्माची एका मोठ्या विक्रमाची संधी हुकली. विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडण्यासाठी त्याला 13 धावा कमी पडल्या. त्याचा विक्रम मोडण्यासाठी 47 धावांची गरज होती. मात्र 34 धावांवरच बाद झाला. एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याची संधी हातून निघून गेली. आता पुढच्या वर्षी त्याला ही संधी शोधावी लागेल. पण यासाठी त्याला 1615 धावा कराव्या लागतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.