नाटकप्रेमींनो लक्ष द्या! विजय केंकरे दिग्दर्शित "सुभेदार गेस्ट हाऊस" लवकरच रंगभूमीवर; कधी आहे शुभारंभाचा प्रयोग
esakal December 20, 2025 08:45 AM

मराठी नाट्यसृष्टीला तसेच रसिक प्रेक्षकांसमोर सातत्याने दर्जेदार नाटके व संगीत नाटके सादर करणारी अग्रगण्य संस्था “धि गोवा हिंदु असोसिएशन” काही काळानंतर पुन्हा एकदा रंगभूमीची सेवा करण्यासाठी सज्ज झाली आहे. धि गोवा हिंदु असोसिएशन आणि सुकल्प चित्र यांच्या संयुक्त विद्यमाने “सुभेदार गेस्ट हाऊस” हे एक नवे कोरे मराठी नाटक येत्या २५ डिसेंबरपासून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धि गोवा हिंदु असोसिएशन, कल्पक सदानंद जोशी आणि अमरजा गोडबोले हे या नाटकाचे निर्माते आहेत. या नाटकाचा पुण्यातील पहिला प्रयोग २५ डिसेंबरला यशवंतराव चव्हाण, कोथरूड तर मुंबईतील पहिला प्रयोग २६ डिसेंबरला शिवाजी मंदिर येथे संपन्न होणार आहे.

“सुभेदार गेस्ट हाऊस” या नाटकाचे लेखन शिरीष देखणे यांनी केले असून दिग्दर्शनाची धुरा विजय केंकरे यांनी सांभाळली आहे. अभिनेता सौरभ गोखले, शंतनू मोघे, अंगद म्हसकर, मृण्मयी गोंधळेकर, विनिता दाते, सना कुलकर्णी, रोहित देशमुख, आनंद पाटील यांच्या महत्वपूर्ण भूमिका या नाटकात पहायला मिळणार आहेत. नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये, संगीत अजित परब, गीत वैभव जोशी, प्रकाश योजना शीतल तळपदे, रंगभूषा शरद विचारे आणि वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. तर सूत्रधार म्हणून श्रीकांत तटकरे व राजेंद्र पै काम पाहत आहे.

View this post on Instagram

A post shared by Subhedar Guest House (@subhedarguesthouse)