राज्याची वीज यंत्रणा मजबूत होणार
esakal December 20, 2025 12:45 PM

राज्याची वीज यंत्रणा मजबूत होणार

७६५ केव्हीच्या पारेषणसाठी करार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : वीजनिर्मिती केंद्रापासून वितरण उपकेंद्रापर्यंत वीज वाहून आणणाऱ्या उच्चदाब वीज वहन यंत्रणा आणि उपकेंद्राचे जाळे आणखी मजबूत होणार आहे. त्यासाठी महापारेषण ७६५ केव्हीचा पारेषण प्रकल्प हाती घेणार आहे. त्याचाच भाग म्हणून महानिर्मितीबरोबर सामंजस्य करार केला आहे. या प्रकल्पासाठी ‘टॅरिफबेस्ड कॉम्पिटिटिव्ह बिडिंग’अंतर्गत संयुक्तपणे निविदा सादर करण्याचा निर्णय दोन्ही वीज कंपन्यांनी घेतला आहे.

भागीदारीमुळे महापारेषणचा पारेषण क्षेत्रातील दांडगा अनुभव आणि महानिर्मितीची मोठ्या वीज प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील तांत्रिक कार्यक्षमता एकत्र येणार आहे. ७६५ केव्ही श्रेणीतील प्रकल्पांसाठी या दोन शासकीय कंपन्यांचे एकत्र येणे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. हा करार महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार आणि महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
---
कराराचे फायदे
- या नवीन प्रकल्पांमुळे वीजवहन क्षमता वाढून ग्रिड अधिक स्थिर होण्यास मदत होईल.
- खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत आता राज्यातील दोन प्रमुख ऊर्जा कंपन्या एकत्र उतरल्याने प्रकल्प खर्चात बचत आणि गुणवत्तेत वाढ अपेक्षित आहे.
- भविष्यातील वाढती विजेची मागणी लक्षात घेता ७६५ केव्हीची यंत्रणा ही ‘पॉवर कॉरिडॉर’साठी कणा ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.