BAMU: पदवी प्रथम वर्षाचे निकाल २७ जानेवारीपर्यंत जाहीर करा; 'होम सेंटर होम असेसमेंट'साठी वेळापत्रक पाळा, अन्यथा कारवाईचा इशारा
esakal December 20, 2025 12:45 PM

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने हिवाळी परीक्षा २०२५ अंतर्गत होणाऱ्या बीए, बीएस्सी आणि बीकॉम (अव्यावसायिक अभ्यासक्रम) प्रथम वर्ष प्रथम आणि द्वितीय सत्राच्या (एनईपी २०२ पॅटर्न च्या २०२४ व २०२५) परीक्षा महाविद्यालय, परिसंस्था स्तरावर होम सेंटर होम ॲसेसमेंट पद्धतीने होत आहेत.

बीए, बीएस्सी आणि बीकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल २७ जानेवारीपर्यंत जाहीर होतील, अशा पद्धतीने नियोजन करण्याचे आदेश परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी.एन. डोळे यांनी दिले.

पदवीच्या होम सेंटर होम ॲसेसमेंट या टप्प्यातील परीक्षेसाठी चार जिल्ह्यांत २६८ परीक्षा केंद्र असून, १५ ते २९ डिसेंबर दरम्यान या परीक्षा होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर ११०, जालना ६०, बीड ६८ तर धाराशिव जिल्ह्यातील ३० केंद्रांचा समावेश आहे. एकूण ८० हजार ७५८ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यामध्ये बीए २८, ५८०, बीएस्सी २९ हजार ७०७, बीकॉम १५ हजार ७३५, बीबीए १ हजार २०२, बीसीए ४ हजार ६८, बीएस्सी (अलाइड विषय) १ हजार ४८६ विद्यार्थी आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पदवी प्रथम वर्ष अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्यास विद्यापीठाची मान्यता असून, परीक्षा आयोजन, उत्तरपत्रिका मूल्यमापन, गुणनोंदणी आणि निकाल जाहीर करण्याची संपूर्ण प्रक्रिया राबवावी, असे परीक्षा विभागाच्या आदेशात म्हटले.

मूल्यमापन झालेल्या उत्तरपत्रिका, मूळ गुणयाद्या, ऑनलाइन नोंदणी केलेल्या आणि प्रिंट काढलेल्या गुणयाद्या तसेच इतर आवश्यक दस्तऐवज राजर्षी शाहू महाराज परीक्षा भवन, विद्यापीठ परिसर येथे जिल्हानिहाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी २० जानेवारी २०२६, जालना २१ जानेवारी, बीड २२ जानेवारी आणि धाराशिव २३ जानेवारी २०२६ अशी कागदपत्रे जमा करण्याची तारीख निश्चित करण्यात आली.

वेळेत निकाल द्या अन्यथा दंड

निकाल जाहीर झाल्यानंतर अंतर्गत आणि प्रात्यक्षिक गुण सादर करताना विलंब झाल्यास दंडाची तरतूदही करण्यात आली. निकालापासून पहिल्या १० दिवसांत २ हजार रुपये, पुढील ५ दिवसांत ३ हजार रुपये आणि त्यानंतर तीन महिन्यांच्या आत गुण सादर केल्यास प्रति विद्यार्थी ५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

MSBTE: उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन १८ दिवसांत पूर्ण; तंत्रशिक्षण पदविका परीक्षा, सव्वाचार लाख उत्तरपत्रिकांसाठी ऑनलाइन प्रक्रिया

दंड भरल्यानंतरच निकाल जाहीर केला जाईल. निर्धारित कार्यपद्धतीचे पालन न करणाऱ्या महाविद्यालयांमुळे विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत अडचणी निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्राचार्य, संचालकांची राहील. त्यांच्यावर नियमानुसार संबंधितांवर कारवाईचा इशाराही संचालक डॉ. बी.एन. डोळे यांनी दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.