आजही अनेक आमदार… निकाल जाहीर होण्यापूर्वी किशोरी पेडणेकरांचे खळबळजनक आरोप
Tv9 Marathi December 21, 2025 06:45 PM

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून नगरपंचायत आणि नगरपरिषद निकालाचे कल येण्यास सुरुवात होणार आहे. आज दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. या निकालांच्या काही वेळ आधी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. महाराष्ट्रात सध्या ‘सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता’ हेच समीकरण सुरू आहे. आजचा निकाल हा केवळ जय-पराजयाचा नसून तो निष्ठेचा की खोक्यांचा हे ठरवणारा असेल, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

अनेक ठिकाणी आमदार पैशांच्या पेट्या घेऊन बसलेत

किशोरी पेडणेकर यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. २ डिसेंबरला मतदान होऊनही निकालासाठी २१ डिसेंबरपर्यंत म्हणजेच सुमारे १९ दिवस वाट पाहावी लागल्याने किशोरी पेडणेकर यांनी संभ्रम व्यक्त केला. निवडणूक आयोग शुद्धीवर आहे का? असा थेट सवाल किशोरी पेडणेकर यांनी विचारला. मतदारांच्या याद्यांमध्ये घोळ घालणे आणि निवडणुका जाणीवपूर्वक लांबणीवर टाकणे हे मतदारांना कमकुवत करण्याचे षडयंत्र आहे. आज अनेक ठिकाणी आमदार पैशांच्या पेट्या घेऊन बसलेत. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता मिळवण्याचा हा प्रयत्न महाराष्ट्राच्या संस्कृतीला घातक आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.

बदलापूरसारख्या घटनांच्या वेळी हे लोक कुठे होते?

सत्ताधाऱ्यांनी वाटलेला पैसा त्यांच्या घरचा नसून तो जनतेचाच आहे, याचे भान मतदारांनी ठेवले पाहिजे. ज्यांनी पैशाला भुलून नाही तर विचार करून मतदान केले आहे, त्यांच्यामुळे आज निष्ठेचाच गुलाल उधळला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कणकवलीतील निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या वादावरही किशोरी पेडणेकर यांनी टीका केली. घरातच दोन भाऊ एकमेकांचे कपडे फाडत आहेत आणि पैशांच्या बॅगा पकडून दिल्या जात आहेत. बदलापूरसारख्या घटनांच्या वेळी हे लोक कुठे होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते दिल्लीच्या दिल्लीश्वरांपुढे झुकले नाहीत

किशोरी पेडणेकर यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले आहे. उद्धव ठाकरेंवर अनेक आरोप करण्यात आले. मात्र एकही सिद्ध झाला नाही. ते दिल्लीच्या दिल्लीश्वरांपुढे झुकले नाहीत. ही निवडणूक अशा व्यक्तीची प्रतिष्ठा वाचवण्याची देखील आहे, ज्याने संकटात महाराष्ट्राला सांभाळले, असेही किशोर पेडणेकर म्हणाल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.