भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची रणनीती
आढावा बैठकीत मतदान केंद्रांवरील सुविधा; सुरक्षेवर सर्वाधिक भर
भिवंडी, ता. २० (वार्ताहर) : भिवंडी–निजामपूर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच पालिका मुख्यालयात प्रशासनाची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अनमोल सागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा, मतदान केंद्रनिहाय मतदार यादीची तयारी, निवडणूक कार्यालयांसाठी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य व वाहतूक व्यवस्था यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदार केंद्र यादी अद्ययावत ठेवण्याच्या तसेच मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. विशेषतः मतदान केंद्रांवर बुरखाधारी महिला मतदारांची ओळख पटविण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी माहिती दिली. तसेच सर्व पोलिस निरीक्षकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
.............
आचारसंहितेचे काटेकोर पालन
आचारसंहिता काटेकोरपणे राबविण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. सर्व राजकीय पक्षांचे बॅनर व होर्डिंग्स पालिकेच्या प्रभाग अधिकारी स्तरावर तत्काळ काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतरही अनधिकृत बॅनर किंवा होर्डिंग्स आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आचारसंहिता भंगाच्या घटनांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले. यासोबतच एस.एस.टी. पथक तातडीने कार्यान्वित करणे, संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, कर्मचारी प्रशिक्षण तसेच मतदान यंत्रांची तपासणी याबाबत उपविभागीय अधिकारी अमित सानप यांनी माहिती दिली. आयुक्तांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसाठी वाहन व निवास व्यवस्थेचाही आढावा घेतला.