Nashik Municipal Election : नाशिकमध्ये सत्तेचे नवीन समीकरण! शहरात भाजपला, तर ग्रामीण भागात राष्ट्रवादीला झुकते माप
esakal December 21, 2025 06:45 PM

नाशिक: महापालिकेची सत्ता मिळविण्यात प्राबल्य राखणाऱ्या भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युतीचा निर्णय घेऊन जिल्हा परिषदेतील सत्तेचा मार्ग मोकळा करून घेतला. शहरात भाजपचे, तर ग्रामीण भागात ‘राष्ट्रवादी’चे वर्चस्व असल्याने उभय पक्षांच्या नेत्यांनी दोन्ही ठिकाणांच्या सत्तेवर हात ठेवण्याचा प्रयोग सुरू केला आहे.

महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजल्याने महायुतीसह महाविकास आघाडीच्या पक्ष कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखतींना बहर आला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाल्याने सत्ता काबीज करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने उतरणार आहे. जास्तीत- जास्त नगरसेवक निवडून आणत आपले वर्चस्व सिद्ध करण्याची ही संधी असल्यामुळे त्या दृष्टीने नेत्यांकडून प्रयत्न होताना दिसतात.

शहरात तीन आमदार असल्यामुळे भाजपला मित्रपक्षांची तशी आवश्यकता भासणार नाही. पण यानिमित्ताने राष्ट्रवादीसोबत युती करून त्यांना बोटावर मोजण्याइतक्या जागा देण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे. विशेषत: मुस्लिम बहुल मतदारसंघ व ज्या ठिकाणी भाजपला यश मिळण्याची शक्यता कमी आहे, अशा जागा राष्ट्रवादीला सोडण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे. राष्ट्रवादीला भाजपची साथ मिळाल्यास विजयाची शत प्रतिशत खात्री वाढते.

त्यामुळे जागांचा आग्रह लावून न धरता, शक्य तेवढ्या जागा पदरात पाडून महापालिकेत सत्तेत सहभागी होण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. नेमकी याउलट परिस्थिती ग्रामीण भागात दिसते. राष्ट्रवादीचे सात आमदार असल्यामुळे त्यांच्या बळावर जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्याचे पक्षाचे नियोजन सुरू आहे. राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपची ताकद येथे कमी असल्याने दोघांमिळून ‘मिनी मंत्रालया’ची निवडणूक लढविण्याची तयारी या पक्षाच्या नेत्यांनी ठेवली आहे. त्यामुळे महापालिका पाठोपाठ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीची युती राहील, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

शिवसेनेचे काय?

महायुतीतील तिसरा घटक पक्ष शिवसेनेला सोबत घेण्याबाबत भाजप व राष्ट्रवादी अनुकूल असले, तरी जागावाटपाचा तिढा सोडविताना अडचण निर्माण होऊ शकते. जागांवर एकमत झाल्यास महायुती अभेद्य राहील; परंतु ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशाच लढती झाल्या आहेत. त्याठिकाणी एकमत कसे होणार, याविषयी शंका आहे. ग्रामीण भागात शिवसेनाही भाजपला सोबत घेण्यास इच्छुक असल्याने भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता अधिक आहे.

Gadhinglaj Election : गडहिंग्लज पालिकेत नव्या पर्वाची चाहूल; डझनभर नवे चेहरे, निकाल ठरवणार तालुक्याची राजकीय दिशा

एकत्र आल्यास परिणाम काय होईल?

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका निवडणुकीला महत्त्व

शहरात राष्ट्रवादीला भाजपची मदत होईल

ग्रामीण भागात भाजपला राष्ट्रवादीची मदत मिळेल

जागांचे योग्य पद्धतीने वाटप झाल्यास सत्तेतही सोबत

बसता येईल

दोन्ही पक्षांची ताकद वाढण्यास मदत होईल

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.