दुर्दैवी घटना! रोटावेटर अंगावर पडून एकाचा मृत्यू; नेवासे तालुक्यातील घटना, घरच्यांचा वारंवार फोन अन् काय घडलं?
esakal December 23, 2025 10:45 PM

नेवासे शहर: नेवासे तालुक्यातील पुनतगाव येथील युवराज दिलीप वाकचौरे (वय २६) या युवकांचा आज शेतात अंगावर रोटावेटर पडून जागीच मृत्यू झाला. युवराज हा माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे यांचा मुलगा आहे.

Pune News:'ड्रायव्हर काकांच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले'; शाळेतील विद्यार्थ्यांना घरी साेडले अन् काय घडलं?

वाकचौरे यांची पाचेगाव शिवारात शेती आहे. त्या शेतात गहू टाकण्यासाठी दिलीप वाकचौरे यांचा एकुलता एक मुलगा युवराज हा सकाळी आपला स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन रोटावेटरचे काम करीत होता. रोटावेटरमध्ये गवत व मातीचे पेंड लागल्याने युवराजने ट्रॅक्टर उभा करून ते काढत असताना रोटावेटर त्यांच्या अंगावर पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

घरच्यांनी वारंवार फोन केला असतानाही युवराज फोन उचलत नसल्याने त्याचा चुलत भाऊ प्रदीप विलास वाकचौरे हा शेतात गेला. युवराज रोटवेटरच्या खाली अडकलेल्या अवस्थेत त्यास आढळून आला. त्याने तातडीने नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह रोटावेटरखालून बाजूला काढला.

आनंदाची बातमी! 'पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास लवकरच १६० किमी वेगाने'; प्रवाशाच्या वेळेची हाेणार बचत..

साधारण ही घटना दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यानंतर युवराजचा मृतदेह नेवासे फाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिराने पुनतगाव येथे शोकाकूल वातावरणात युवराजवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बीएस्सी ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केलेल्या युवराजचा दहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.