Uddhav Thackeray: फुटाल तर संपाल, उद्धव ठाकरे यांचा दिल्लीकडे बोट दाखवत तो इशारा, मराठी माणसाला काय दिला सल्ला?
Tv9 Marathi December 24, 2025 10:46 PM

Uddhav Thackeray And Raj Thackeray Alliance : अखेर शिवेसना आणि मनसेची महापालिका निवडणुकीसाठी युती जाहीर झाली. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही मोठी घोषणा केली. दोन्ही पक्षांना किती जागा मिळाल्या हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले. तर आगामी इतर महापालिकेतील जागा वाटपाची भूमिकाही त्यांनी जाहीर केली.उमेदवाराची घोषणा अथवा जागा वाटपाची माहिती समोर आली नसली तरी मनोमिलन आणि आता मतमिलन झाल्याचे समोर आले आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिल्लीकडे बोट दाखवत मोठे आवाहन केलं आहे.

फुटाल तर पूर्णपणे संपाल

यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीकडे बोट दाखवत चिमटे काढले. त्यांनी यावेळी मराठी माणसाला मोठे आवाहन केले आहे. गेल्यावेळी भाजपने नरेटिव्ह सेट केलं होतं कटेंगे तो बटेंग, असे ते नरेटिव्ह त्यांनी सेट केलं होतं. आता मी सांगतो,आता चुकाल तर संपाल. फुटाल तर पूर्णपणे संपून जाल हे मराठी माणसांना सांगतो.तुटू नका, फुटू नका. मराठीचा वसा टाकू नका,असे आवाहन त्यांनी मराठी माणसांना केलं आहे. त्यांनी मराठी मतदारांना मोठी हाक, मोठी साद घातली आहे. आता दोन्ही बंधू एकत्र आले आहेत. आता मराठी माणसांनी पाठीशी राहावं असं आवाहन एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

कोणती घेतली शपथ

संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली. यामागे मोठा संघर्ष आहे. १०७ हुतात्मे झाले. मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. त्याची आठवण होणं स्वाभाविक आहे. आम्ही ठाकरे बंधू बसले आहोत.आमचे आजोबा संयुक्त महाराष्ट्रातील पहिल्या पाच सेनापतींपैकी एक. त्यानंतर माझे वडील बाळासाहेब ठाकरे आणि माझे काका श्रीकांत ठाकरे म्हणजे अख्खं ठाकरे घराणं मुंबईसाठी संघर्ष करत होते. मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यावर उपरे नाचायला लागले. त्यावेळी न्याय हक्कासाठी शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला. पुढच्या वर्षी ६० वर्ष होतील. इतकी वर्ष व्यवस्थित गेली. परत एकदा मुंबईचे लचके तुडवण्याचं काम सुरू आहे. ज्यांचे प्रतिनिधी आज दिल्लीत बसले आहेत. दिल्लीवाल्यांचे मनसुबे आहेत. आपण भांडण राहिलो तर हुतात्मा स्मारकाचा अपमान होईल. कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत. एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. यापुढे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणाऱ्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन उतरलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तर बाकीच्या महापालिकांपर्यत कालपर्यंत युती झाली. नाशिकमध्ये झाली. इतर पालिकांवर आज उद्या शिक्कामोर्तब होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मराठी ऐक्याचा मंगल कलश

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे.मी सकाळी कुणाला तरी सांगितलं की आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला तो मराठी ऐक्याचा मंगल कलश होता. आजही मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन राज आणि उद्धव आले आहेत. तोच आनंदाचा क्षण घेऊन आले आहेत. हाच मंगल कलश मुंबईसह अनेक महापालिकेत विजयी भगवा फडकवल्याशिवाय राहू शकणार नाही. महाराष्ट्राला ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात. महाराष्ट्र ठाकरेंच्याच मागे राहील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.