Year Ender 2025: प्रिन्सने 2025 गाजवलं, कॅप्टन्सीसह बॅटिंगनेही धमाका, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारे 5 फलंदाज, शुबमन कितव्या स्थानी?
GH News December 26, 2025 01:12 AM

टीम इंडियाचा युवा ओपनर शुबमन गिल याला निराशाजनक कामगिरीमुळे आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून डच्चू देण्यात आला. शुबमनला 2025 या वर्षात टी 20i फॉर्मेटमध्ये 1 अर्धशतकही झळकावता आलं नाही. मात्र हा अपवाद वगळता शुबमनसाठी 2025 हे वर्ष अविस्मरणीय ठरलं. शुबमनला भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली. तसेच शुबमनने कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचा अपवाद वगळता कर्णधार आणि फलंदाज म्हणून अप्रतिम कामगिरी केली. शुबमन 2025 या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या निमित्ताने 2025 मध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या 10 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

शुबमन गिल

शुबमन गिल याने 2025 वर्षात कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून भारताचं 35 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. शुबमनने या दरम्यान 49 च्या सरासरीने आणि 7 शतकं आणि 3 अर्धशतकांसह एकूण 1 हजार 764 धावा केल्या.

शाई होप

विंडीजचा विकेटकीपर बॅट्समन शाई होप याची या वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज होण्याची संधी अवघ्या 5 धावांनी हुकली. शाईने 2025 वर्षात 42 सामन्यांमध्ये 5 शतकं आणि 9 अर्धशतकांसह 1 हजार 760 धावा केल्या.

जो रुट

इंग्लंडचा जो रुट याने फक्त कसोटी आणि वनडे क्रिकेट खेळून 2025 वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा तिसरा फलंदाज होण्याचा बहुमान मिळवला. इंग्लंडच्या या दिग्गज फलंदाजाने 24 सामन्यांमध्ये 7 शतकं आणि 5 अर्धशतकांसह एकूण 1 हजार 598 धावा केल्या.

ब्रायन बेनेट

झिंबाब्वेच्या ब्रायन बेनेट याने 2025 वर्षात तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून एकूण 39 सामने खळेले. ब्रायनने या 39 सामन्यांमध्ये 1 हजार 585 धावा केल्या. ब्रायनने या वर्षात 3 शतकं आणि 8 अर्धशतकं झळकावली.

सलमान अली आगा

पाकिस्तानचा सलमान अली आगा हा 2025 या वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. सलमानने एकूण 56 सामन्यांमध्ये 2 शतकं आणि 9 अर्धशतकांसह एकूण 1 हजार 569 धावा केल्यात.

करणबीर सिंह

ऑस्ट्रेलियाच्या करणबीर सिंह यानेही 2025 वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली. करणबीर याने 2025 या वर्षात 32 सामन्यांमध्ये 2 शतक आणि 13 अर्धशतकांसह एकूण 1 हजार 488 धावा केल्या आहेत.

हॅरी ब्रूक

इंग्लंडचा हॅरी ब्रूक 2025 वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सातव्या स्थानी आहे. इंग्लंडच्या या फलंदाजाने या वर्षात एकूण 37 सामन्यांमध्ये एकूण 1 हजार 468 धावा केल्या.

बेन डकेट

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2025 वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 10 फलंदाजांच्या यादीत बेन डकेट हा आठव्या स्थानी आहे.डकेटने 32 सामन्यांमध्ये 1 हजार 448 धावा केल्या आहेत.

पाथुम निसांका

श्रीलंकेच्या पाथुम निसांका याने 2025 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 34 सामन्यांमध्ये 1 हजार 414 धावा केल्या आहेत. पाथुम टॉप 10 मध्ये असणारा श्रीलंकेचा एकमेव फलंदाज आहे.

रचीन रवींद्र

न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचीन रवींद्र हा या यादीत 10 व्या स्थानी आहे. रचीनने 2025 मधील 32 सामन्यांमध्ये एकूण 1 हजार 382 धावा केल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.