तात्या लांडगे
सोलापूर : राज्यातील ९४ लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी ५२६ कोटी रुपयांचा विमा हिस्सा भरला होता. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सव्वादोन लाख शेतकऱ्यांचे सुमारे १४ कोटी रुपये होते. पीक कापणी प्रयोगानंतर आता अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न आणि प्रत्यक्षात आलेल्या उत्पन्नाची माहिती केंद्र सरकारला पाठविण्यात आली आहे. त्यावर कार्यवाही सुरू असून जानेवारीअखेर पात्र शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळणार आहे.
राज्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, तूर अशा पिकांची लागवड होते. याशिवाय कांदा व अन्य पिके देखील असतात. राज्य सरकारने ‘एक रुपयात पीकविमा योजना बंद केल्यानंतर देखील तब्बल ९४ लाख शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्यास विमा मिळेल, या आशेने स्वत: विमा संरक्षित रक्कम भरून पिकांचा विमा भरला. राज्यात सुमारे ५० हजार ठिकाणी पीक कापणी प्रयोग पार पडले. त्यातून अपेक्षित उंबरठा उत्पन्न व प्रत्यक्षातील उत्पन्नाची माहिती संकलित करण्यात आली. राज्य सरकारच्या कृषी विभागाने ती माहिती केंद्र सरकारला पाठविली आहे.
केंद्राकडे या माहितीवर कार्यवाही सुरू असून २० जानेवारीनंतर राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, महसूल मंडळातील शेतकरी पीकविमा मिळण्यास पात्र आहेत, कोणत्या पिकांना विमा भरपाई मिळणार आहे, हे स्पष्ट होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पीकविमा उतरविलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळणार नाही, असेही अधिकारी म्हणाले. काही तालुक्यातील ठरावीक मंडळातील शेतकऱ्यांना तर काही जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील शेतकरी पीकविम्यासाठी पात्र ठरतील, असेही सांगण्यात आले.
खरीप पीकविम्याची स्थिती अशी...
अर्जदार शेतकरी
९४ लाख
शेतकऱ्यांनी भरलेला हिस्सा
५२६ कोटी
राज्य व केंद्राचा हिस्सा
१८६० कोटी
उंबरठा उत्पन्नावर मिळतो पिकविमा
उंबरठा उत्पन्नापेक्षा प्रत्यक्षात आलेले उत्पन्न जास्त असल्यास पीकविमा मिळत नाही. आपल्याकडील उंबरठा उत्पन्न पूर्वीपासूनच कमी असल्याने सर्वच विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही. पुढील महिन्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा पीकविमा मिळेल.
- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर