राजकारणात कोण कोणाचा कायमस्वरुपी मित्र नसतो, कायमस्वरुपी शत्रू नसतो, राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, या वाक्यांचा शब्दश: अर्थ काल लक्षात आला. बुधवारी मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली म्हणून जो नेता नाचत होता, पेढे वाटत होता. त्याने काल अचानक भाजपमध्ये प्रवेश केला. हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी मोठा धक्का आहे. कारण ज्या नेत्याला राज ठाकरेंनी सर्वकाही दिलं, मान-सन्मान,अधिकार दिले त्याने अशी तडकाफडकी दुसऱ्या पक्षात उडी मारावी, याचा अर्थ राजकारणात विचारधारा, तत्व, निष्ठा आपल्या सोयीनुसार बदलतात हेच दिसून आलं. दिनकर पाटील हे मनसेधील मोठे नेते होते. त्यांचा पूर्व इतिहास हा पक्ष बदलाचा राहिला आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता.
दिनकर पाटीलयांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सर्व मान-सन्मान देण्यात आला. अधिकार दिले. त्यांनी मागच्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्यावेळी ऐनवेळी भाजपला सोडचिठ्ठी देऊन मनसेमध्ये प्रवेश केला होता. त्यांना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. दिनकर पाटील हे नाशिकमधील राजकीय महत्वकांक्षा असलेले नेते म्हणून ओळखले जातात. मागच्यावर्षी भाजपकडून लोकसभेच तिकीट मिळवण्यासाठी ते इच्छुक होते. पण त्यावेळी ही जागा शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आली. तेव्हापासूनच ते भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरु झालेली. विधानसभेला त्यांनी मनसेमध्ये प्रवेश करुन नाशिक पश्चिमची उमेदवारी मिळवली.
अचानक भाजप प्रवेशामागे कारणं काय?
आता ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मनसेमध्ये दिनकर पाटील हे प्रदेश सरचिटणीस होते. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी ते उमेदवारांच्या मुलाखती घेत होते. काल अचानक त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राजकारणातील अनिश्चितता असते ती हीच. नाशिकच्या सातपूर भागात दिनकर पाटील यांचं वर्चस्व आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीत दिनकर पाटील यांची पत्नी आणि मुलाला तिकीट निश्चित मानलं जात आहे. अचानक भाजप प्रवेशामागे ही सर्व समीकरणं आहेत.
राज ठाकरेंबद्दल काय म्हटलं?
तुम्ही मनसे का सोडताय? मनसेमध्ये तुम्ही कोणावर नाराज आहात का? हा प्रश्न दिनकर पाटील यांना विचारला. त्यावर त्यांनी ‘मी कुठेही नाराज नाही. मी विकासासाठी चाललो आहे’ असं उत्तर दिलं. ‘मी राज साहेबांवर नाराज नाही. मी विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करतोय’ असं उत्तर दिनकर पाटील यांनी दिलं.