Railway Station: भारतीय रेल्वे ही देशात प्रवासासाठी सर्वात विश्वसनीय, लोकप्रिय आणि स्वस्त माध्यम मानल्या जाते. रोज लाखो लोक ट्रेनने त्यांच्या इच्छित स्थळी पोहचतात. दूरच्या प्रवासासाठी तर रेल्वे हा सर्वात चांगला पर्याय मानल्या जातो. तर रोजच्या प्रवासातही अनेक जण रेल्वे प्रवासालाच महत्त्व देतात. भारतात मोठ्या संख्येने रेल्वे प्रवाशी रोज प्रवास करतात. ट्रेनच्या प्रवासात अनेकदा विविध स्टेशनची नावं समोर येतात. स्टेशनवर ट्रेन थांबली की त्यावेळी तिथली पाटी आपण आवर्जून पाहतो. त्यावर स्टेशनचे नाव लिहिलेले असते. त्या नावासोबत जंक्शन,सेंट्रल आणि टर्मिनल सारखे शब्द जोडलेले असतात. पण असं का लिहिल्या जातं हे अनेकांना माहिती नसतं.
जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनलचा वापर का?
अनेक रेल्वे स्टेशनच्या नावासोबत जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनल सारखे शब्द जोडल्या जातात. पण अनेकदा हे त्या रेल्वे स्टेशनचेच नाव असल्याचे अनेकांना वाटते. त्याच्या अर्थावर कुणीही लक्ष देत नाही. पण रेल्वे स्टेशनच्या मागे आणि पुढे लिहिलेल्या या शब्दांचा एक खास अर्थ असतो. त्यामागे एक खास कारण आहे. त्या नावावरून स्टेशनची भूमिका आणि महत्त्व समोर येते. पण का लिहितात ही नाव स्टेशनच्या नावासोबत?
Junction का लिहिण्यात येते?
तर काही स्टेशनसोबत जंक्शन असं लिहिल्या जाते. या ठिकाणी विविध दिशेने रेल्वे लाईन येतात. या स्टेशनवर विविध रेल्वे स्टेशनकडे जाण्याचे मार्ग निघतात. म्हणजे प्रवाशांना विविध शहरांकडे आणि राज्यांकडे जाण्यासाठी ट्रेन बदलण्याचे हे ठिकाण आहे. रेल्वे नेटवर्कमधील हे एक महत्वाचा पाईंट आहे. या ठिकाणाहून देशातील विविध ठिकाणी जाण्याचा मार्ग सापडतो.
Central लिहिण्यामागे कारण काय?
सेंट्रल असं लिहिलेल्या स्टेशनचे एक खास महत्त्व असतं. खासकरून सेंट्रल स्टेशन हे सर्वात जुने आणि सर्वाधिक व्यग्र स्टेशन असते. येथे प्रवासी आणि रेल्वेची भाऊगर्दी असते.येथून देशातील जवळपास सर्वच रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी रेल्वे मिळते. कानपूर सेंट्रल आणि मुंबई सेंट्रल हे त्याचे एक चांगले उदाहरण आहे. या रेल्वे स्टेशनवर कायम गर्दी असते. येथे अनेक सोयी-सुविधा मिळतात.
याशिवाय काही रेल्वे स्टेशनच्या मागे टर्मिनल असे लिहिलेले असते. टर्मिनलचा अर्थ अखेरचे स्टेशन असा होतो. या स्टेशनवरून रेल्वे सुटतात आणि येथे शेवटी थांबतात, ते स्टेशन म्हणजे टर्मिनल असते. येथून पुढे रेल्वे जात नाही. येथे रेल्वेचा प्रवास थांबतो. येथे रेल्वेचे मोठे आगार असते. याठिकाणी रेल्वे स्वच्छ करण्यापासून इतर अनेक कामं करण्यात येतात.