BMC Election 2026 : अखेर युतीचं ठरलं, आकडा समोर आला, मुंबईत भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना किती जागांवर लढणार? जाणून घ्या
Tv9 Marathi December 26, 2025 11:45 PM

बहुचर्चित मुंबई महानगरपालिका निवडणुका लढवण्यासाठी युतीचा फॉर्म्युला ठरला आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये मागच्या काही दिवसांपासून बैठकांचं सत्र सुरु होतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वात प्रतिष्ठेची मानली जाते. मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवणाऱ्या पक्षाची भले राज्यात सत्ता नसेल पण राजकारणात एक वेगळं महत्व असतं. मागच्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता होती. पण 2022 साली शिवसेनेत फूट पडली. शिवसेनेच पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आता एकनाथ शिंदेंकडे आहे. उद्धव ठाकरे यांना मशाल हे नवीन निवडणूक चिन्ह घ्यावं लागलं आहे. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. राज्यभरात त्यांचे फक्त 20 आमदार निवडून आले.

मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जायचा. पण आता हा गड शाबूत राहिलेला नाही. इथे भाजपने आपला पाया मजबूत केला आहे आणि आता शिवसेना शिंदे गटाने सुद्धा प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाची पालिका निवडणूक दोन्ही ठाकरे बंधुंसाठी अस्तित्वाची लढाई आहे म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. उद्धव ठाकरे यांचे आजच्या घडीला मुंबईत 10 आमदार आहेत, तेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 6 आमदार आहेत. भाजपचे सर्वाधिक 15 आमदार आहेत. भाजपला काहीही करुन मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकावायचा आहे. त्यामुळे यंदाच्या पालिका निवडणुकीत ते आपली सर्व ताकद पणाला लावतील यात शंका नाही.

पालिका निवडणुका त्यांच्यासाठी सोप्या असणार नाहीत

नुकत्याच झालेल्या नगरपरिषदा आणि नगर पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वात खराब कामगिरी केली. त्यात उद्धव ठाकरे गटाची सर्वात सुमार कामगिरी होती. त्यामुळे पालिका निवडणुका त्यांच्यासाठी सोप्या असणार नाहीत. समोर भाजप, शिंदेंसारख्या बलाढ्य पक्षांच आव्हान आहे. दरम्यान मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना जागा वाटपासंदर्भात महत्वाची बातमी आहे.

शिवसेना-भाजपचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय?

युतीचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मुंबई महापालिकेत 227 वॉर्ड आहेत. त्यात भाजप 140 जागा लढवेल. शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला 87 जागा येतील. आरपीआयला भाजपच्या कोट्यातून जागा मिळतील अशी सूत्रांची माहिती आहे. भाजपचा 150 जागांसाठी प्रयत्न आहे. पण त्यांना 140 वर समाधान मानावे लागेल अशी सूत्रांची माहिती आहे. विधानसभा निहाय कुठल्या वॉर्डातून कोण निवडणूक लढवणार या बद्दल अजून स्पष्टता नाहीय..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.