कल्याण-डोंबिवलीत भाजपने दिलं शिंदेंना टेन्शन, थेट महापौरपदावर दावा; नाही तर…
Tv9 Marathi December 26, 2025 11:45 PM

कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. एकीकडे युती-आघाडी, जागावाटपाची चर्चा होत असताना दुसरीकडे कल्याण डोंबिवलीत भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे टेन्शन वाढवले आहे. त्यामुळे महायुतीतील वातावरण तापू लागले आहे. नुकत्याच झालेल्या बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकांमधील यशामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांनी थेट ८३ जागा आणि पाच वर्षांसाठी महापौर पदावर दावा ठोकला आहे.

जागावाटपाचा पेच सुटण्याऐवजी अधिकच वाढला

भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात समन्वय साधण्यासाठी १३ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असली, तरी जागावाटपावरून दोन्ही पक्षांत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीचे नियोजन आणि जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी भाजपने ७ आणि शिवसेनेने ६ असे एकूण १३ सदस्य असलेली समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या आतापर्यंत दोन महत्त्वाच्या बैठका पार पडल्या आहेत. मात्र, दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे जागावाटपाचा पेच सुटण्याऐवजी अधिकच वाढल्याचे चित्र आहे.

मागण्या मान्य झाल्या तरच युती होईल

भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी स्पष्ट केले की, अंतर्गत सर्व्हेनुसार भाजप ८० पेक्षा जास्त जागा जिंकू शकते. २०१५ च्या निवडणुकीत भाजपला महापौर पद मिळाले नव्हते, त्यामुळे यावेळी पूर्ण ५ वर्षांचा कार्यकाळ भाजपला मिळावा, ही आमची प्रमुख अट आहे. कार्यकर्त्यांच्या भावना युतीपेक्षा स्वबळावर लढण्याकडे जास्त आहेत. आमच्या मागण्या मान्य झाल्या तरच युती होईल, अन्यथा स्वतंत्र लढण्याची मानसिक तयारी आहे, असे सूचक विधान पवार यांनी केले आहे.

आम्ही ८३ जागांचा प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवला असून, २०१५ चा संदर्भ पाहता ५ वर्षांचा महापौर पदाचा प्रस्ताव त्यांना मान्य असल्याचे दिसत आहे, असा दावा भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केला आहे. शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी सावध पण सकारात्मक पवित्रा घेतला आहे. मोरे यांच्या मते, सध्या शिवसेनेकडे ७० ते ७२ नगरसेवक आहेत तर भाजपकडे ५३ ते ५७ नगरसेवक आहेत. आकड्यांपेक्षा निवडून येण्याची क्षमता (Elective Merit) पाहूनच जागावाटप व्हावे, यावर आमचा भर आहे. बैठका खेळीमेळीच्या वातावरणात होत असून अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे वरिष्ठ नेते घेतील. महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे कार्यकर्ते आपला बालेकिल्ला राखण्यासाठी आग्रही

वरिष्ठ पातळीवर समन्वय समितीच्या माध्यमातून एकी दाखवण्याचा प्रयत्न होत असला तरी, कल्याण-डोंबिवलीतील दोन्ही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांविरोधात सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून स्वतंत्र लढण्यासाठी नेत्यांवर दबाव टाकला जात आहे. तर शिवसेनेचे कार्यकर्ते आपला बालेकिल्ला राखण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत जागावाटपाचा हा पेच सुटतो की युतीत फूट पडते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.