वूमन्स टीम इंडियाच्या चिवट बॉलिंगसमोर श्रीलंका सलग तिसऱ्या सामन्यातही (India vs Sri Lanka Women 3rd T20I) ढेर झाली आहे. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला पहिल्या 2 सामन्यात 130 पार पोहचून दिलं नव्हतं. त्यानंतर आता श्रीलंकेला तिसर्या सामन्यात 100 च्या स्ट्राईक रेटनेही धावा करता आल्या नाहीत. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 7 झटके देऊन 112 धावांवर रोखलं. त्यामुळे आता टीम इंडियाला विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी फक्त 113 धावा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल, यात शंका नाही. मात्र श्रीलंका या छोट्या धावसंख्येचा बचाव करताना कशी बॉलिंग करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियाने पहिल्या दोन्ही सामन्यातही श्रीलंकेला मोठी धावसंख्या करण्यापासून यशस्वीरित्या रोखलं होतं. श्रीलंकेने टीम इंडिया विरुद्ध पहिल्या सामन्यात 121 तर दुसऱ्या टी 20i सामन्यात 128 धावा केल्या होत्या. भारताने हे विजयी आव्हान सहज पूर्ण केलं आणि सलग 2 सामने जिंकले. त्यामुळे श्रीलंकेसाठी तिसरा सामना हा करो या मरो असा झाला. श्रीलंकेला या अटीतटीच्या लढतीत 3 बदलांसह मैदानात उतरली. मात्र टीम मॅनेजमेंटला त्या बदलांचा श्रीलंकेच्या बॅटिंगवर अपेक्षित परिणाम पाहायला मिळाला नाही.
टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या श्रीलंका टीमकडून फक्त चौघींनाच दुहेरी आकडा गाठता आला. त्यातही फक्त 3 फलंदाजांनाच 20 पार मजल मारता आली. श्रीलंकेसाठी इमेशा दुलानी हीने सर्वाधिक धावा केल्या. इमेशाने 32 चेंडूत 27 धावा जोडल्या. ओपनर हसिनी परेरा हीने 25 धावांचं योगदान दिलं. कविषा दिल्हारी हीने 20 धावा केल्या.
तर अखेरच्या क्षणी कौशनी हीने मालिकी मदारा हीच्यासह काही धावा जोडल्या. त्यामुळे श्रीलंकेला 100 पार पोहचता आलं. कौशनीने 16 बॉलमध्ये नॉट आऊट 19 रन्स केल्या. तर चौघींना दुहेरी आकडा गाठता आला नाही.
टीम इंडियासमोर 113 धावांचं आव्हान
टीम इंडियाकडून एकूण 6 खेळाडूंनी बॉलिंग केली. मात्र भारताच्या 2 गोलंदाजाच श्रीलंकेला पुरून उरल्या. भारतासाठी रेणुका सिंग, क्रांती गौड, दीप्ती शर्मा, वैष्णवी शर्मा, अमनजोत कौर आणि श्री चरणी यांनी बॉलिंग केली. या पैकी रेणुका सिंग आणि दीप्ती शर्मा या दोघींनीच या 7 विकेट्स घेतल्या. रेणूकाने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर दीप्तीने श्रीलंकेला 3 झटके दिले.