जिल्हा रुग्णालयाकडून पोलिस
बोधचिन्हाचा बेकायदेशीर वापर
जयवंत बरेगार ः कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ओरोस यांच्या आवारात सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे नाव व बोधचिन्हासह दंडाचे फलक लावून बेकायदेशीर वापर केल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्यांचे पालक, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, अभ्यंगत यांच्यामध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बरेगार यांनी केला आहे. याबाबत चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी ओरोस पोलिस ठाण्यात केली आहे. या फलकातील मजकुराखाली ओरोस पोलिस ठाण्याचे नाव व पोलिस खात्याचा लोगो वापरण्याकरिता रीतसर परवानगी घेतली आहे का? हा फलक लावण्याबाबत कोणताही शासन निर्णय, परिपत्रक, शासन आदेश आहे का? याबाबतची माहिती मागितली आहे. असा कोणताही नियम नसल्यास व पोलिस खात्याची परवानगी न घेता पोलिस ठाण्याचे नाव व लोगो वापरल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी बरेगार यांनी केली आहे.