औद्योगिक ग्राहकांचा
महावितरणला आधार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : राज्याच्या कानाकोपऱ्यात वीज वितरण करणाऱ्या महावितरणचे घरगुती, कृषी पपंधारक, वाणिज्यिक आणि औद्योगिक असे तीन कोटींहून अधिक वीजग्राहक आहेत. यामध्ये औद्योगिक वीजग्राहकांचा महावितरणला माेठा आधार मिळत आहे. राज्यभरात सुमारे चार लाख ४८ हजार उच्चदाब व लघुदाब औद्योगिक ग्राहक असून, महावितरणच्या एकूण महसुलापैकी ४१ टक्के त्यांचा वाटा आहे.
महावितरणला राज्यभरात घरगुती आणि कृषी पंपधारक हा मोठा ग्राहक असून, त्यांच्याकडून खूप कमी महसूल मिळताे. दर महिन्याला वितरित केल्या जाणाऱ्या विजेचे सुमारे १०-११ हजार कोटी रुपये बिलिंग होते. त्यामध्ये सद्य:स्थितीत औद्योगिक ग्राहकांचा एकूण वीजवापरात ४३ टक्के, तर महसुलात ४१ टक्के वाटा आहे. त्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा आणि अखंडित वीजपुरवठा देता यावा, त्यांना तक्रारी मांडता याव्यात म्हणून महावितरणने ऑनलाइन ‘स्वागत सेल’ पोर्टल सुरू केले आहे. तसेच औद्योगिक वर्गवारीत लघु व उच्चदाबाच्या दरवर्षी सुमारे २३ हजारांवर नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. त्यामुळे औद्योगिक वीजग्राहक महावितरणच्या दृष्टीने मोठा आधार असून, त्यांच्याकडील वीजबिलाची वसुली ९९ टक्क्यांहून अधिक आहे.